माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं आता मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. शरद पवारांविषयी दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी एक वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाले होते दिलीप वळसे पाटील?

शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशात नाही असं आपण म्हणतो. पण दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या एकट्याच्या बळावर महाराष्ट्रातल्या जनतेने एकदाही राष्ट्रवादीला पूर्ण बहुमत दिलं नाही. शरद पवार पूर्ण बहुमतावर एकदाही मुख्यमंत्री झाले नाहीत. ममता बॅनर्जी स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या, मायावतीही झाल्या होत्या. मात्र शरद पवार हे उत्तुंग नेते असतानाही राष्ट्रवादीने ठराविक संख्येच्या पुढे मजल मारलेली नाही. पक्षाचे ६० ते ७० आमदार निवडून येतात कुणाशीही तरी आघाडी करावी लागते. असं वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांनी केलं होतं. त्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर आता माझ्या वक्तव्यचा विपर्यास केला गेला असं आता वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “…म्हणून राष्ट्रवादीला पूर्ण बहुमत मिळालं नाही”, रोहित पवारांचं मोठं विधान; वळसे पाटलांना केलं लक्ष्य!

दिलीप वळसे पाटील यांनी आज काय स्पष्टीकरण दिलं?

माझ्या वाक्याचा अर्थ मीडियाने चुकीचा लावलेला दिसतो आहे. माझं संपूर्ण भाषण जर ऐकलं तर लक्षात येईल की मी शरद पवारांविषयी असे उद्गार काढलेले नाहीत. माझं म्हणणं असं होतं की गेली ४० ते ५० वर्षे शरद पवारांनी या राज्यासाठी, देशासाठी काम केलं आहे. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यातले अनेक पक्ष स्वतःच्या हिंमतीवर बहुमत मिळवून सत्तेवर बसले आहेत. मात्र महाराष्ट्रातल्या जनतेने अशी शक्ती शरद पवार यांच्या मागे उभी केली नाही याची मला खंत आहे. मी खंत व्यक्त करत होतो, त्यात शरद पवारांना कमी लेखण्याचा किंना काही चुकीचं बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं आता दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. शरद पवार हे आमचे नेते आहेत, तेच भविष्यातही आमचे नेते राहतील असंही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “…हा माणूस प्रत्यक्षात अत्यंत कृतघ्न निघाला”, वळसे-पाटलांच्या शरद पवारांवरील टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

रोहित पवार यांची टीका

दरम्यान, शरद पवारांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या व्यक्तीकडून असं विधान आल्यानंतर रोहित पवारांनी दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. “मला आश्चर्य वाटतंय. लोक कदाचित असं म्हणतील की शरद पवारांच्या आसपास जे लोक आहेत त्यांनी ज्या पद्धतीने जबाबदारी पार पाडायला हवी होती, ती त्यांनी पार पाडली नसावी, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्णपणे बहुमत मिळालं नाही”, असं रोहित पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शरद पवारांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, ज्यांना ताकद दिली, तेच जर आज या काळात, या वयात त्यांच्याबरोबर नसतील, जो विचार त्यांनी ३५-४० वर्षं स्वत: जपला, त्या विचाराला सोडून जर ते पलीकडे गेले असतील, तर आज त्याबाबतीत त्यांना बोलायचा किती हक्क आहे हे बघावं लागेल”, अशा शब्दांत रोहित पवार यांनी दिलीप वळसे पाटलांना लक्ष्य केलं.