एके काळी औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या अहमदनगरमध्ये गेल्या पंचवीस वर्षांत एकही नवा उद्योग आलाच नाही. रक्तरंजित राजकारण, खंडणीखोरी, दहशत आणि दलालांचा सुळसुळाट यांमुळे एकही उद्योग नगरमध्ये गुंतवणूक करण्यास तयारच नाही. या परिस्थितीमुळे शहराचा विकास पुरता खंडित झाला शहरातील रोजगाराच्या संधी पूर्णत थंडावल्या आहेत. औद्योगिकदृष्टय़ा नगर हे शहर पूर्णत कोलमडले आहे. उद्योगविश्वात हे शहर बदनाम झाले आहे. नगरच्या केडगावमधील दुहेरी खून प्रकरणानंतर शहराच्या या दुरवस्थेची कारणे शोधली जाऊ लागली असून, सारे खापर स्वमग्न आणि पोटभरू राजकारण्यांच्या माथ्यावर फोडण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.
गेल्या पंचवीस वर्षांत नगरच्या विकासाचे प्रश्न कोणत्याच राजकीय नेत्याने हाती घेतलेच नाहीत. सामाजिक किंवा आíथक प्रश्नदेखील दुर्लक्षितच राहिले. त्यामुळे शहराच्या आíथक उत्पन्नाचे स्रोतही पुरते आटून गेले. आता तर स्वार्थी राजकारणाचे लोण महापालिका, शिक्षण क्षेत्रांतही पसरू लागले आहे. एक तर विकासाची कामे अभावानेच सुरू असतात, आणि जी कामे काढली जातात, त्यामध्येही अगोदर टक्केवारीची गणिते केली जातात. या भ्रष्टाचारामुळे महापालिकादेखील बरबटली अहे. उत्पन्नाचे नवे स्रोत नाहीत, कराची वसुली नाही, त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असून कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या मनमानीची भर पडल्याने, महापालिकेचा कारभार कोलमडण्याच्या स्थितीत आहे. एके काळी नगरचा कारभार कायनेटिकसारख्या एका उद्योगाकडून मिळणाऱ्या उत्पन्नावर चालत असे. फिरोदियांकडून विविध कर, जकात आदींमुळे जमा होणाऱ्या निधीतून नगरचा कारभार पाहणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रशासकीय खर्च भागत असे. काही वेळा तर, कायनेटिककडून करांची आगाऊ वसुली करून कर्मचाऱ्यांचे पगार दिले जात असत. अर्थात, आíथक चणचण हे नगरचे नेहमीचेच दुखणे असताना, आता तर उदासीन आणि आपल्याच तुंबडय़ा भरणाऱ्या नेत्यांनी राजकारणाचेच गुन्हेगारीकरण केल्याने, ही परिस्थिती सुधारणे अवघड असल्याचे मत नगरवासी व्यक्त करतात.
शिवसेनेचे अनिल राठोड हे गेल्या पंचवीस वर्षांपासून नगरचे आमदार आहेत, तर खासदारकी भाजपचे दिलीप गांधी यांच्याकडे आहे. नगरच्या विकासाची वाताहत शिवसेनेच्या आमदारामुळे झाली असा थेट आरोप खासदार दिलीप गांधी करतात. उद्योगपतींना मारहाण करण्यापर्यंत, त्यांच्यावर हात उचलण्यापर्यंत मजल गेल्याने आता नव्या उद्योगांसाठी गुंतवणूक करण्यास कुणीच पुढे येत नाही, असे दिलीप गांधी म्हणतात. मी दिल्लीतून अनेक उद्योगपतींशी संपर्क साधून त्यांना नगरमध्ये गुंतवणूक करण्याची विनंती केली, परंतु शहरातील दहशत, काही घराण्यांच्या गोतावळ्यांची झुंडशाही, खंडणीखोरी व दहशत यांमुळे औद्योगिक कलह वाढतील या भीतीने नगरकडे फिरकण्यास उद्योगपती तयारच नाहीत, असे ते म्हणतात.
उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा तर नगरमध्ये खडखडाटच आहे. साधे पिण्याचे पाणीदेखील पुरेशा दाबाने मिळत नाही, रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. उद्याने, खेळांची मदाने आदी सार्वजनिक सुविधांकडे कधीच लक्ष दिले गेलेले नाही, जागोजागी कचऱ्याचे ढीग, वाहतुकीची कोंडी, अशा अनेक समस्या दिवसागणिक उग्र होत असताना, प्रस्थापित राजकीय घराणी मात्र, मारामाऱ्या, दहशत, खंडणी वसुली, अशा गुन्हेगारी कारवायांद्वारे आपले स्थान भक्कम करण्यात मग्न आहेत.
नगरमधील एका नामांकित शैक्षणिक संस्थेचा कारभार स्थानिक आमदाराच्या अमलाखाली आहे. या संस्थेत आमदारांच्या टोळ्यांचा राबता वाढला, छेडछेडीसारखे प्रकार घडू लागले, त्यामुळे या संस्थेतील विद्याíथनींची संख्यादेखील आता रोडावत चालली आहे, असे बोलले जाते.
ग्रहण..
नगरमधील या दहशतीविरुद्ध उघडपणे बोलण्यास स्थानिक जनता फारशी तयार नसते. दहशतीचे सावट दैनंदिन जीवनावरही दिसते. खून, अपहरणासारख्या घटनांनी नगरचे राजकारण पुरते रक्तरंजित झाले आहे. राजकारणालाच ग्रहण लागल्याने शहराच्या विकासालाही ग्रहण लागणारच, असे नागरिक सांगतात. साडेतीन वर्षांपूर्वी सत्तांतर झाल्यावर या दहशतवादाचा बीमोड केला जाईल, अशी अपेक्षा होती, पण उलट त्यांनाच पाठीशी घातले जात असल्याच्या भावनेने नगरकरांमध्ये निराशा दाटली आहे.