आधी महाराष्ट्र, मग ‘ऑल इंडिया बेस्ट कॅडेट’!
‘माझ्या सैन्यातील प्रवेशाची ही पहिली पायरी आहे. दिल्लीत पंतप्रधानांच्या हातून गौरव होताना आनंद, अभिमान अशा सर्व भावना दाटून आल्या होत्या. कॅम्पमध्ये केलेल्या सर्व कष्टांचे चिज झाले असे वाटले. आता पदवीधर झालो की परीक्षा देऊन सैन्यात अधिकारी म्हणून भरती होणार.’राष्ट्रीय छात्र सेनेतील ‘ऑल इंडिया बेस्ट कॅडेट’ हा किताब मिळवलेल्या पुष्पेंद्रसिंगचे हे मनोगत त्याच्या जिद्दी वृत्तीची साक्ष देणारे आहे.
नगर महाविद्यालयात एफ. वाय. बी. ए. च्या वर्गात शिकत असलेल्या पुष्पेंद्रसिंगने एनसीसीत अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘ऑल इंडिया बेस्ट कॅडेट’ हा किताब पटकावला. पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते त्याला २८ जानेवारीला दिल्लीत सुवर्णपदक देण्यात आले. प्रजासत्ताक दिनी राजपथवर झालेल्या संचलनात तो सहभागी होता.
या संचनालनासाठी निवडण्यात आलेल्या राज्यातील १०५ जणांच्या चमूतच पुष्पेंद्रसिंगची ‘महाराष्ट्र बेस्ट कॅडेट’ म्हणून निवड झाली होती. खडतर प्रशिक्षणाशिवाय बेस्ट कॅडेटसाठी सामान्यज्ञान चाचणी, गटचर्चा, मुलाखत, इंग्रजी संभाषण अशा अन्य परिक्षाही घेतल्या जातात. दिल्लीत देशातील प्रत्येक राज्यातून आलेल्या अशा बेस्ट कॅडेट्सची पुन्हा याच पद्धतीने लष्करातील विविध अधिकाऱ्यांकडून परीक्षा घेतली जाते. त्यातही पुष्पेंद्रसिंगने बाजी मारली व नगर महाविद्यालयाला पर्यायाने नगर जिल्ह्य़ालाही प्रथमच हा बहुमान मिळवून दिला.
कॅम्पबाबत त्याने सांगितले की, सलग १० दिवसांचे १० कॅम्प, नंतर त्यातून निवड मग दिल्लीत सुमारे महिनाभर पुन्हा परेड, फायरिंग असे खडतर प्रशिक्षण यातून एनसीसीचा छात्र हा अर्धा सोल्जर होऊन जातो. या प्रशिक्षणातून वैयक्तीक जीवनातही शिस्त, देशप्रेम, टापटीप, सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, एकाग्रतेने अभ्यास करणे असे बरेच काही मिळते. या सर्व सवयी आपोआप अंगात भिनातात. एनसीसी प्रवेशाचा हा फार मोठा फायदा आहे.
दिल्लीतील अनुभव कसा होता यावर पुष्पेंद्रसिंगने देशातील सगळ्या राज्याचा परिचय दिल्लीत झाला असे सांगितले. सर्व राज्यातून ‘एनसीसी’चे छात्र आले होते. त्यांच्याबरोबर सलग सव्वा महिना राहिल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या देशाची ओळख पटली.परराज्यातील छात्रांशी मैत्री होते, त्यांच्या चालीरिती समजतात, आपल्या त्यांना समजून देता येतात. अनेकविध सांस्कृतिक कार्यक्रमही या महिनाभरात होतात. त्यामुळे आपली संस्कृती समजते. या क्षेत्रात गती असणाऱ्या छात्राला आपले ते कौशल्य दाखवण्याची संधी यातून मिळते. बेस्ट कॅडेट्सना लष्कराच्या तिन्ही दलातील प्रमुखांना भेटवण्यात येते, त्यांच्याबरोबर चर्चा करता येते. सगळे लष्करी अधिकारी आमची शब्दश: मुलांप्रमाणे काळजी घेत असतात. रांगडे, रागीट, कठोर दिसणारे सैन्यातील अधिकारी कसे छात्रांशी वागताना किती प्रेमळ होतात ते अनुभवता आले असे पुष्पेंद्रसिंगने
सांगितले.
मात्र, प्रशिक्षणादरम्यान त्यांचे वागणे पुन्हा कठोर होते. जे काही कराल ते प्रामाणिकपणे व पुर्ण मेहनत घेऊन असे त्यांचे आम्हाला सांगणे असायचे. परेडमध्ये एखादा पाय टाकायला उशीर झाला किंवा लवकर टाकला तरीही परेडची लय बिघडते. ते बारकाईने लक्ष देतात व करून घेतात.
नगरच्या १७ महाराष्ट्र बटालियनचे कर्नल के. एस. मारवा, दिल्लीत परेड प्रशिक्षक म्हणून आलेले नायब सुभेदार राजेंद्रसिंग, नगर महाविद्यालयाचे एनसीसी प्रमुख मेजर शाम खरात तसेच कॅम्पमधील विविध लष्करी अधिकारी यांची या यशासाठी फार मोठी मदत झाली. महाविद्यालयानेही विश्वास दाखवला व तो सार्थ ठरवता आला याचा आनंद आहे असे पुष्पेंद्रसिंगने सांगितले. तो मुळचा मथूरेचा रहिवासी आहे. मात्र वडिल सैन्यात अधिकारी असल्याने गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातच आहे. त्याचे शालेय शिक्षण पुण्यात झाले आहे. मोठा भाऊही सैन्यातच आहे, सध्या त्याचे ऑफिसर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, चेन्नई येथे प्रशिक्षण सुरू आहे.पुष्पेंद्रसिंगलाही सैन्यातच अधिकारी म्हणून जायचे आहे.
सुवर्णपदकाबाबत बोलताना त्याने सांगितले की, पंतप्रधानाच्या हस्ते ते स्विकारताना कॅम्पमध्ये काढलेले सर्व कष्ट आठवले व त्याचे चीज झाल्याचा आनंद झाला. अगदी आदल्या दिवशी सकाळी मला त्याबाबत सांगण्यात आले व लगेचच सराव करण्यासाठी घेऊन गेले. प्रत्येक विद्यार्थ्यांने ‘एनसीसी’ त प्रवेश घेतलाच पाहिजे. तिथे जे मिळते ते अन्य कुठेही मिळणार नाही. जरूरी नाही की एनसीसीतील प्रत्येक मुलाने सैन्यात गेलेच पाहिजे, मात्र कुठेही, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर शालेय वयात ‘एनसीसी’चा धडा घेतलाच पाहिजे असे मत पुष्पेंद्रसिंगने व्यक्त केले.