अहिल्यानगर : कर्नाटकमधून आलेली आणि गुजरातकडे चाललेली तब्बल ६ कोटी १७ लाख ८५ हजार रुपये किमतीची लाल सुपारी, १५ लाख ६० हजार रुपये किमतीच्या तंबाखूसह २ कोटी १० लाख रुपये किमतीच्या १३ मालमोटारी असा एकूण ८ कोटी ४३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल नगर पोलिसांनी करचुकवेगिरी व गुटख्यासाठी सुपारी वापरली जात असल्याच्या कारणावरून जप्त केली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आज, गुरुवारी ही माहिती दिली. घार्गे यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. १३ मालमोटारी राहुरीमध्ये पकडण्यात आल्या आहेत. पोलिसांनी १० चालकांसह शिमगो (कर्नाटक) व दिल्ली येथील संबंधित कंपन्यांना नोटीस बजावून कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे; मात्र, अद्याप उत्तर मिळालेले नाही.

राहुरी तालुक्यातील चिंचोली गावाच्या शिवारात गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, अंमलदार रमेश गांगर्डे, गणेश लबडे, राहुल द्वारके, लक्ष्मण खोकले, भीमराज खडसे, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, सतीश भवर, सुनील मालणकर, महादेव भांड, उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ताब्यात घेतलेल्या मालमोटरचालकांकडून वेगवेगळी माहिती दिली जात होती. त्यामुळे शासनाचा कर चुकवून व बनावट देयके तयार करून सुपारी नेली जात होती. ही सुपारी गुटखा तयार करण्यासाठी वापरली जाणार होती. अहिल्यानगर जिल्ह्यात नगर शहरासह पाथर्डी, शेवगावमध्ये गुटख्याचे अनेक कारखाने अलीकडे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत, असेही पोलीस अधीक्षक घार्गे यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी

सुपारी गुटख्यासाठी वापरली जाण्याबरोबरच करचुकवेगिरी करूनही जात होती, चालकांकडे कोणतीही देयके आढळली नाहीत. हस्तलिखिताद्वारे बनावट देयके तयार करण्यात आली व माल पोहोचवण्याचा पत्ता दिल्ली असा नमूद करण्यात आलेला होता, असेही जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले.

त्यामुळेच या प्रकरणाची माहिती केंद्रीय व राज्य जीएसटी विभाग, अन्न व औषध प्रशासन, महसूल गुप्तचर संचालनालय यांना देण्यात आली आहे. त्यांनीही या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचे घार्गे यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी सुपारी, तंबाखू व मालमोटारी तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. संबंधित कंपन्यांकडून कागदपत्रे उपलब्ध झाल्यानंतर गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन गुन्हा दाखल केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

लाल सुपारी निकृष्ट दर्जाची

जप्त करण्यात आलेली सुपारी लाल आहे. ती निकृष्ट दर्जाची आहे. ती कदाचित आयात केलेली असावी, असाही पोलिसांना संशय आहे. सुपारी व गुटखा एकत्र वाहतूक करण्यामागे गुटख्यासाठी वापर हेच प्रमुख कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही सुपारी वाहनमालक मोहम्मद अक्रम (कर्नाटक) याची असल्याचे वाहनचालकांनी सांगितले. त्यांनाही नोटीस बजावून कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. पोलिसांनी वाहनचालकांनाही नोटीस बजावली आहे. १० चालकांपैकी तिघे नगर जिल्ह्यातील, एक सोलापूर जिल्ह्यातील, उर्वरित हरियाणा, राजस्थानमधील आहेत.

दोन लाख किलो सुपारी

जप्त केलेल्या सुपारीचे वजन २ लाख ५ हजार ९५० किलो, तर जप्त केलेल्या तंबाखूचे वजन ७८०० किलो आहे. यासह १३ मालमोटारी अशी एकूण ८ कोटी ४३ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आहे. सुपारी व तंबाखूची पोती मालमोटारींमध्ये ठेवलेली होती.