वनपाल व वनरक्षकपदावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी नागपूर प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक दीपक भट यांनी मोठय़ा प्रमाणावर रक्कम गोळा करून ती घेऊन ते पुण्याला जात असल्याचे कळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना शुक्रवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून १९ लाख २५ हजार रुपये हस्तगत करण्यात आले. भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्याच्या या अटकेमुळे वनखात्यात खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीपक भट ही रक्कम घेऊन पुण्याला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी त्यांच्या ताफ्यासह धरमपेठेतील खासगी बसस्थानकाजवळ सापळा रचला. भट त्यांच्या वाहनातून खाली उतरताच बसमध्ये चढण्याआधीच त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या बॅगची झडती घेतल्यानंतर नागपुरातल्या विविध बँकांचे लेबल असलेल्या नोटांचे बंडल त्यात आढळले. रात्री साडेअकरापर्यंत लगतच्याच म्हाडा वसाहतीत त्यांची चौकशी करून त्यानंतर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात नेण्यात आले. तेथे रात्री दीड वाजेपर्यंत चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी मुलांच्या अ‍ॅडमिशनसाठी हा पैसा सासऱ्यांकडून आणल्याचे कारण दिले. मात्र, भट यांची दोन्ही मुले नोकरीवर आहेत आणि सासरे नाशिकला असतात. चौकशीत त्यांनी वनमंत्र्यांच्या सचिवाचेही नाव घेतल्याचे कळते, पण त्याला दुजोरा मिळू शकला नाही. रक्कम सील करून हा पैसा कुठून आणला, यामागील कारण स्पष्ट करण्यासाठी त्यांना ४८ तासांची मुदत देण्यात आली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur forest officer arrested
First published on: 31-05-2015 at 09:23 IST