नागपूरच्या वनखात्याने वाघाची परवानगी न घेताच त्याला पुण्याला पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पात मुक्कामास असलेल्या या वाघाने वनखात्याला दाद द्यायचीच नाही, अशी जणू खूणगाठ बांधल्यामुळे वनखात्यासमोर अडचण निर्माण झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पिंजऱ्यात येण्यास नकार देऊन पुण्याविषयी नाखुषी दाखवणाऱ्या या वाघाला अखेर बेशुद्ध करूनच पुण्याला पाठवण्याचा घाट नागपूर वनखात्याने घातला आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पातील मोठय़ा पिंजऱ्यात बोर अभयारण्यातील दोन वाघिणी आणि एका वाघाला ठेवण्यात आले आहे. मानवी सहवासापासून दूर ठेवलेल्या या तिन्ही वाघांना शिकारीचेही प्रशिक्षण दिले होते. त्यातील दोन वाघिणींना जंगलात सोडण्याचा, तर एका वाघाला प्राणीसंग्रहालयात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. वनखात्याच्या जखमी वाघांची काळजी घेणाऱ्या महाराजबाग प्राणीसंग्रहालयाने या वाघाची मागणी केली. मानवी जीवनाप्रमाणेच वाघांचेही प्रमाण कायम राखण्यासाठी या प्राणीसंग्रहालयातील तीन वाघिणींकरिता या वाघाची मागणी केली. या मागणीला बगल देऊन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत यांनी त्याला पुण्यातील कात्रज प्राणीसंग्रहालयाला पाठवण्याचा निर्णय घेतला.
शुक्रवार, २२ ऑगस्टला या वाघाला नेण्यासाठी पुण्याहून वनकर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह दाखल झाले. गेल्या तीन दिवसांपासून या वाघाला वाहनातील पिंजऱ्यात घेण्याचा प्रयत्न पुणे व पेंचचा चमू करीत आहे. मात्र, वाघानेही पिंजऱ्यात येण्याचे टाळून जणू पुण्यास न जाण्याचा पवित्रा घेतला आहे. अखेर या वाघाला ‘ट्रॅक्विलाईजर’ने बेशुद्ध करून पिंजऱ्यात टाकण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत यांना तीन महिन्यापूर्वीच असा कोणताही निर्णय घेऊ नये, असे पत्र दिले होते. या वाघावर कोणताही प्रयोग न करता त्याला प्राणीसंग्रहालयात पाठवून जन्मठेप देणे योग्य नाही, हे देखील सांगितले. मात्र, या पत्राला त्यांनी केराची टोपली दाखवून कोणतेही उत्तर दिले नाही, असे नागपूर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी सांगितले.

More Stories onसिंहLion
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur lion refuse to go pune
First published on: 26-08-2014 at 01:29 IST