बदलत्या परिस्थितीत कालबाह्य़ ठरलेल्या जकातीला पर्याय ठरणाऱ्या स्थानिक संस्था कराला (एलबीटी) राज्यभरातील व्यापाऱ्यांकडून तीव्र विरोध होत असला तरी मुख्यमंत्र्यांनी एलबीटीपासून माघार घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने नागपुरातील व्यापाऱ्यांचे आंदोलन आणखी पेटण्याची शक्यता आहे. तळपत्या उन्हाने नागपूरकरांचे हाल सुरू असतानाच गेल्या १४ दिवसांपासून व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्याचा फटका आता सामान्य ग्राहकांनाही बसू लागला आहे. शहरात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला असून किमतीतही अचानक मोठी वाढ झाली आहे. व्यापारी संघटनांची पालक संघटना असलेल्या असोसिएशन ऑफ फेडरेशन ऑफ महाराष्ट्र(फॅम)ने एलबीटीविरोधी आंदोलन जारी ठेवण्याचा इशारा दिल्याने येणाऱ्या दिवसांमध्ये परिस्थिती आणखी चिघळण्याची लक्षणे दिसू लागली आहेत.
राज्यातील सर्व महापालिकांमध्ये एलबीटी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून एलबीटीच्या अंमलबजावणीबाबत असलेल्या शंका दूर करण्यासाठी दहा सदस्यीय समिती गठीत करण्याचे जाहीर केले आहे. या समितीत व्यापारी संघटनांचे पाच आणि राज्य सरकारतर्फे पाच सचिव असे एकूण दहा सदस्य राहणार आहेत. मात्र, व्यापाऱ्यांचे नेते मागण्यांवर ठाम असल्याने राज्यभरातील आणखी आंदोलन पेटण्याची चिन्हे असून यात सर्वसामान्य ग्राहकाची होरपळ होऊ लागली आहे. नागपुरात ठोक खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले असून आता चिल्लर व्यापाऱ्यांनीही आंदोलनात उडी घेतल्याने दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळणे दुरापास्त होऊ लागले आहे.
जकातीला पर्याय असलेला ‘एलबीटी’ लागू करण्यापासून सरकार मागे हटणार नसल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिल्याने व्यापारी संघटनाही हट्टास पेटल्या असून बेमुदत उपोषणाचा फेरा सोमवारपासून सुरू झाला आहे. दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठाने तब्बल १४ दिवसांपासून बंद असल्याने चिल्लर व्यापाऱ्यांनाही माल मिळेनासा झाला आहे. याचा फायदा उचलत जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ करून त्या विकल्या जात आहेत. तेल, साखर, डाळी, तांदूळ आणि साखर चढय़ा दराने विकले जात आहेत. गहू आणि तांदळाच्या किमतीत प्रति किलो १५ रुपयांची सरळसरळ वाढ करण्यात आली आहे. डाळींच्या किमती १० ते १५ रुपयांनी वाढविण्यात आल्या आहेत. किराणा दुकानांमध्ये तांदूळ ‘ब्लॅक’मध्ये विकत घेण्याची वेळ गरजूंवर आली आहे. दुधाच्या किमतीतही सहा ते आठ रुपयांनी वाढ झाली आहे.
अनिश्चितकालीन हरताळ असल्याने लोकांनीही महिन्याचा किराणा घेण्यासाठी किरकोळ दुकानदारांकडे धाव घेणे सुरू केले आहे. त्यामुळे किरकोळ दुकानदारांजवळील मालाचा साठा आता संपण्याच्या मार्गावर आहे. ठोक व्यापाऱ्यांचा धंदा पूर्णपणे बंद असल्याने किरकोळ दुकानदारांना जवळ असलेल्या साठय़ातूनच दिवस काढावे लागणार आहेत. याचा पुरेपूर फायदा घेऊन ग्राहकांची पिळवणूक केली जात आहे. शीतपेये, दही यांच्याही किमती वाढल्या आहेत. पशुपालकांनाही एलबीटीचा तडाखा बसला असून जनावरांना दररोज लागणाऱ्या आहारासाठी पशुमालक दारोदारी भटकत आहेत. चुनी, ढेप प्रचंड महाग झाले आहेत. महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना द्यावा लागणाऱ्या आहारातील खाद्यान्नही मिळेनासे झाल्याने ‘ब्लॅक’मध्ये खरेदी करण्याची वेळ आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th May 2013 रोजी प्रकाशित
‘एलबीटी’विरोधी आंदोलन चिघळणार
बदलत्या परिस्थितीत कालबाह्य़ ठरलेल्या जकातीला पर्याय ठरणाऱ्या स्थानिक संस्था कराला (एलबीटी) राज्यभरातील व्यापाऱ्यांकडून तीव्र विरोध होत असला तरी मुख्यमंत्र्यांनी एलबीटीपासून माघार घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने नागपुरातील व्यापाऱ्यांचे आंदोलन आणखी पेटण्याची शक्यता आहे. तळपत्या उन्हाने नागपूरकरांचे हाल सुरू असतानाच गेल्या १४ दिवसांपासून व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्याचा फटका आता सामान्य ग्राहकांनाही बसू लागला आहे.
First published on: 06-05-2013 at 01:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur traders to continue with indefinite bandh till lbt solution