गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जसजसे स्पष्ट होत आहेत तसतशा राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुजरात निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय. “गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची आयात झाली आणि तरुणांमध्ये व्यसनाधिनता वाढवली,” असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी व्यक्त केलं. तसेच भय, भ्रष्टाचार, भूक अशा सर्व गोष्टींचा गुजरात निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचाही आरोप केला. ते गुरुवारी (८ डिसेंबर) एबीपी माझाशी बोलत होते.

नाना पटोले म्हणाले, “गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची आयात झाली. मुंद्रा पोर्टावर मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण, भय, भ्रष्टाचार या सर्व गोष्टींचा गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर झाला.”

“मतदानाच्या वेळी भय, भ्रष्टाचार आणि व्यसनाधिनता हे अपेक्षित नाही”

“जो निकाल आला त्याचं आम्ही स्वागत करतो. लोकशाहीत मतदानाच्या वेळी भय, भ्रष्टाचार आणि व्यसनाधिनता हे अपेक्षित नाही. आम्हाला गुजरातमध्ये ज्या कमी जागा मिळाल्या त्याचं आम्ही आत्मपरिक्षण करू. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस गुजरातमध्ये चांगली कामगिरी करेल,” असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं.

व्यसनाधिनता आहे म्हणून गुजरातमध्ये भाजपाचा विजय झाला का?

नाना पटोलेंनी निकालावर बोलताना व्यसनाधिनतेचा उल्लेख केल्यावर व्यसनाधिनता आहे म्हणून गुजरातमध्ये भाजपाचा विजय झाला का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “व्यसनाधिनता आहे म्हणून गुजरातमध्ये भाजपाचा विजय झाला असं म्हणालो नाही. भय, भ्रष्टाचार, भूक ही प्रक्रिया वापरण्यात आली. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर सुरतमध्ये दबावतंत्राचा वापर करण्यात आला. आयकर आणि ईडीने छापे टाकले. हे का विसरले जात आहेत. पहिल्या टप्प्यानंतर जाणीवपूर्वक भय निर्माण करण्यात आलं.”

हेही वाचा : “असं वक्तव्य करायला यांची जीभ कशी वळते?” ; मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दुसऱ्या टप्प्यात मोदी-शाहांनी भयाचं वातावरण निर्माण केलं”

“दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह कामाला लागले आणि एक भयाचं वातावरण निर्माण केलं. मी त्यावर आक्षेप घेतला आहे. माझा निकालावर आक्षेप नाही, त्याचं आम्ही स्वागतच केलं आहे. व्यसनाधितनाच नाही, तर जो गुजरात आज निर्माण होतोय ते लोकशाहीला योग्य नाही. व्यसनाधिनता आहे म्हणून भाजपा जिंकली असा माझा आक्षेप नाही,” असंही नाना पटोले यांनी नमूद केलं.