पालघर : “भाजपाने उत्तर प्रदेशाच्या निवडणुका कसेही करून निवडून येण्यासाठी आर्यन खान प्रकरण समोर आणलं, “असा गंभीर आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. तसेच “देशातील तरुण-तरुणींच्या हाताला काम देण्याऐवजी त्यांना बेरोजगारीच्या खाईत लोटण्याचे काम नरेंद्र मोदींच्या भाजपा सरकारने केले आहे,” असं मत व्यक्त केलं. पालघर दौऱ्यावर आले असताना काँग्रेस भवनच्या एका सभागृहात घेलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरातच्या अदानी बंदरावर सापडलेल्या कोट्यावधी रुपयांच्या अमली पदार्थाविषयी बोलताना नाना पटोले म्हणाले, “अदानी बंदरावर विदेशातून अमली पदार्थ आणले जाते व अनेकदा ते पकडले गेले आहे. हा कट उधळणाऱ्या अधिकाऱ्यांना शाबासकी देण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई केली गेली. याचा अर्थ या प्रकरणांमध्ये केंद्रातल्या भाजपा सरकारचा सहभाग आहे. भारतात असे अमली पदार्थ आणून देशातल्या तरुणांचा उडता पंजाब करून तरुणाईला संपवण्याचे पाप भाजप करत असल्याचे सिद्ध होत आहे.”

“यूपी निवडणूक जिंकण्यासाठी आर्यन खान प्रकरण समोर आणलं”

“महाराष्ट्रामध्ये भाजपा सरकार वेगवेगळ्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडी सरकारला नाहक त्रास देण्याचे कटकारस्थान व अभद्र चाळे करत आहे. उत्तर प्रदेशाच्या निवडणुकांमध्ये भाजपाला कसेही करून निवडून यायचे होते. यासाठी महाराष्ट्रामध्ये आर्यन खान अमली पदार्थ प्रकरण समोर आणून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. मतांसाठी जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न भाजपाने केला,” असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला.

“भाजपाचा आर्यन खान प्रकरणातील डाव उघडा पडला”

“आता आर्यन खानला अमली पदार्थ प्रकरणांमध्ये पकडणाऱ्या त्याच केंद्राच्या तपास यंत्रणेने त्याच्याकडे असे कुठलीही अमलीपदार्थ नव्हते, असे सांगून त्याची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे भाजपाचा तो डाव उघडा पडला आहे. भाजपा या कटकारस्थानामुळे तोंडावर पडली आहे,” असंही नाना पटोले यांनी नमूद केलं.

पालघर जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस पक्ष मागे पडल्याची प्रामाणिक कबुली नाना पटोले यांनी दिली. यापुढे काँग्रेस पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करून येत्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काँग्रेस स्थान निर्माण करेल, अशी ग्वाही त्यांनी येथे दिली. यावेळी त्यांच्यासोबत पालघर जिल्हा सहसंपर्कप्रमुख यशवंत सिंग ठाकूर जिल्हा अध्यक्ष प्रफुल पाटील, पालघर मधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी. डी तिवारी आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole criticize bjp modi government over aryan khan drugs case pbs
First published on: 27-05-2022 at 22:01 IST