“रवींद्र धंगेकर यांना जवळपास ८० हजार मतदान मिळेल, अशी अपेक्षा नाना पटोले यांनी व्यक्त केली. तरिही धंगेकरांना सतर्क राहण्यासाठी सांगितले आहे. आपलं अपयश भाजपा इतक्या सहजतेने पचविणार नाही. लोकांचा कौल गडबड करुन बदलण्याचा प्रयत्न भाजपा करेल. त्यामुळे जिथे मतमोजणी सुरु आहे, तिथे आपली लोकं तैनात करा. भाजपा रडीचा डाव खेळू शकते, त्यामुळे धंगेकर यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
नाना पटोले पुढे म्हणाले, “भाजपाच्या धोरणांवर तरुण, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी नाखुश आहेत. बेरोजगारी आणि महागाई वाढली, व्यापारी उध्वस्त झाले आहेत. दहशत पसरवून आणि पैसे वाटून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न झाला असल्याचे कसबा-चिंचवडमध्ये सर्वांनी पाहिलं. संपूर्ण मंत्रिमंडळ दोन्ही मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. पण जनतेचा कौल सर्वात महत्त्वाचा असतो. हा महाराष्ट्र असून फुले-आंबेडकरांची कर्मभूमी असलेल्या या भूमीत ज्या पद्धतीचे राजकारण केले, त्याचे उत्तर जनता आता देत आहे. चिंचवडमध्ये थोडा फरक आहे, तिथेही मविआचा उमेदवार पुढे जाईल, अशी आमची खात्री आहे. कसब्यात मात्र काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे.”
“निवडणुकीच्या प्रचारात सरकारमधील अधिकारी, त्यांचे लोक पैसे वाटताना दिसून आले आहेत. राज्यातल्या पुरोगामी विचारांना डाग लावण्याचा प्रयत्न झाला आहे, त्यावर विधीमंडळात आम्ही चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, जे लोक पैसे देऊन मतं विकत घेतात, त्यांना लोकशाही मान्य नसते.”, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
एक वाजेपर्यंत निकाल हाती लागतील. दोन्ही मतदारसंघातील हालचालीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. कसब्यातील जनतेचे आम्ही आभार मानतो. कसब्याच्या जनतेला ज्यांनी गृहीत धरले होते. त्यांना मतदानातून चोख उत्तर जनतेने दिले आहे.