Nana Patole On Sangram Thopate : काँग्रेसचे नेते तथा भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. संग्राम थोपटे हे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी स्वत:च आज पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षानेच काँग्रेस सोडण्याची वेळ आणल्याचं विधान संग्राम थोपटे यांनी आज केलं. आता त्यांच्या या विधानावर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘संग्राम थोपटे जिकडे जाण्याचे बघत आहेत तिकडे फार अंधारच आहे’, असं म्हणत नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नाना पटोले काय म्हणाले?

“पक्ष सोडत असताना ज्या पक्षाने तुम्हाला नावारुपाला आणलं त्या पक्षावर आरोप करायचे नसतात. एवढं सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे. आता काय करायचं ते त्यांची मर्जी आहे. पण त्यांना अजूनही माझा सल्ला आहे की संग्राम थोपटे जिकडे जाण्याचे बघत आहेत तिकडे फार अंधारच आहे. त्यामुळे आता त्यांना एवढ्या वर्षांची त्यांची राजकीय कारकीर्ज अंधाराकडे न्यायची असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे”, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

संग्राम थोपटे काय म्हणाले होते?

“आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही अनेक वर्ष काँग्रेसचं काम करत आहात. मात्र, प्रामाणिकपणे काम करत असतानाही पक्षाने तुम्हाला कायम डावलण्याचं काम केलं. शेवटी तुम्हाला मतदारसंघात जनतेनी तीन वेळा संधी दिली. मतदारसंघात तुम्ही विकासाची कामे केली. पण मतदारसंघात अजून विकासाच्या कामांना गती द्यायची असेल तर आपल्याला दुसऱ्या पक्षात जावं लागेल. त्यामुळे अशा पद्धतीचा निर्णय आज झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला आहे”, असं संग्राम थोपटे यांनी म्हटलं.

‘काँग्रेस सोडण्याची वेळ काँग्रेसनेच आणली…’

“मला काँग्रेसकडून कुठेही थांबवण्याचा प्रयत्न झाला नाही. खरं तर मला काँग्रेस सोडण्याची वेळ काँग्रेसनेच आणली. २००९ साली मी पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून आलो. पक्षाने मला उमेदवारी दिली आणि मी निवडून आलो. तेव्हा मी नवीन होतो. त्यानंतर २०१४ ला मी पुन्हा निवडून आलो. त्यानंतर २०१९ साली पुन्हा निवडून आलो. तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. तेव्हा काँग्रेसला १२ मंत्रि‍पदे मिळाली होती. मला संधी मिळेल अशी भावना होती. पण तेव्हा मला संधी मिळाली नाही”, असंही ते म्हणाले.

“त्यानंतर नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा मला वाटलं होतं की मला संधी मिळेल. पण तेव्हाही मला संधी मिळाली नाही. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेतून गेल्यानंतर विरोधीपक्ष नेतेपदाची संधी मिळेल अशी अपेक्षा होती, पण तेव्हाही संधी मिळाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना आता अशी झाली आहे की पुण्यासारख्या जिल्ह्यात देखील तुम्ही तीनवेळा निवडून आलात तरी देखील तुम्हाला संधी मिळाली नाही. त्यामुळे पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला पाहिजे अशी भावना कार्यकर्त्यांशी झाली. त्यामुळे हा निर्णय घेतला”, असं संग्राम थोपटे यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणत्या पक्षात प्रवेश करणार?

“देशात किंवा राज्यात भाजपाचं सरकार सत्तेत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचं मत आहे की आपल्या मतदारसंघात विकास कामांना जर गती द्यायची असेल तर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे.आता कार्यकर्त्यांचं मत आहे की मी भारतीय जनता पक्षाची राजकीय भूमिका घेतली पाहिजे. तेथेच आपल्याला न्याय मिळेल. येणाऱ्या २२ एप्रिल रोजी भाजपात पक्ष प्रवेश होईल”, असं संग्राम थोपटे यांनी म्हटलं.