ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात आला. हा कार्यक्रम रविवारी (१६ एप्रिल) दुपारी नवी मुंबईतल्या खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो लोक जमले होते. दुपारच्या रणरणत्या उन्हात हा कार्यक्रम पार पडला.

तब्बल ४२ अंश सेल्सियस तापमानात आप्पासाहेबांचे अनुयायी या मैदानात जमले होते. कडक उन्हात ४-५ तास बसल्यामुळे अनुयायांना उष्माघाताची समस्या जाणवली. काहीजण चक्कर येऊन पडले, तर अनेकांना उलटी झाली. त्यामुळे या अनुयायांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यातील १३ जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. या मृत्यूंनंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे हे मृत्यू झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले यांनी हे मृत्यू चेंगराचेंगरीमुळे झाले असल्याची शंका व्यक्त केली आहे. पटोले यांनी एक व्हिडीओ त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लोकांची मोठी गर्दी दिसत आहे. तसेच गर्दीत काही लोक जमिनीवर कोसळल्याचं दिसत आहे. यासह रुग्णवाहिकांच्या सायरनचा आवाजही ऐकायला येतोय. हा व्हिडीओ महाराष्ट्र भूषण सोहळा संपल्यानंतर घरी परतण्यासाठी गर्दी केलेल्या श्री सदस्यांचा असल्याचा दावा केला जात आहे.

हे ही वाचा >> अतिक अहमदच्या हत्येच्या निषेधाचे महाराष्ट्रात झळकले बॅनर, केला ‘शहीद’ असा उल्लेख

नाना पटोले यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमुळे? खोके सरकार नक्की काय लपवतंय? या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे. मी राज्यपाल रमेश बैस यांना हे सरकार बरखास्त करण्याची विनंती करतो.