वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लक्ष्य केलं होतं. “नाना पटोले इंग्रजी चित्रपट हॉट अँड ब्लो प्रमाणे हवा कधी गरम, कधी नरम अशी वक्तव्य ते करतात”, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. याला आता नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

“नाना पटोले इंग्रजी चित्रपट हॉट अँड ब्लो प्रमाणे हवा कधी गरम, कधी नरम अशी वक्तव्य ते करतात. नागपुरात त्यांनी म्हटलं, काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार. महाविकास आघाडीत बसलं की म्हणतात आम्ही एकत्र लढणार. त्यामुळे हा फसवण्याचा जो भाग आहे, त्याचं टार्गेट कोण आहे, हे उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यावं”, असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं.

हेही वाचा : “मोदींनी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे राजकारण…”, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

“लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबद्दल आम्ही…”

याबद्दल नाना पटोले यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं. त्यावर पटोले म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तेथील नेत्यांशी चर्चा करून स्वतंत्र लढणार, अशी भूमिका आम्ही घेतली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबद्दल आम्ही भूमिका मांडली नाही. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबाबत चर्चा करणं योग्य नाही.”

“विधानसभा निवडणुकीनंतर जे काही निकाल येतील, त्या आधारावर…”

डोंबिवलीत नाना पटोले यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर्स लागले आहेत. याबाबत विचारल्यावर नाना पटोलेंनी सांगितलं, “काँग्रेसची ही प्रथा आणि परंपरा नाही. विधानसभा निवडणुकीनंतर जे काही निकाल येतील, त्या आधारावर मुख्यमंत्री निश्चित होईल. महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांपासून एक नवीन वातावरण तयार झालं आहे. एका पक्षात तीन-तीन मुख्यमंत्री करून टाकले आहेत.”

हेही वाचा : “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गारूडी, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…”, नाना पटोलेंचं टीकास्र

“हा अधिकार हायकमांडला आहे”

“काँग्रेसचाही मुख्यमंत्री व्हावा, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. पण, कार्यकर्त्यांना सांगू की, अशी चूक पुन्हा करू नका. कारण, हा अधिकार हायकमांडला आहे,” असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं.