काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होणाऱ्या कारवाईवरून भाजपावर निशाणा साधला आहे. मात्र, यावेळी बोलताना नाना पटोले यांनी राज कुंद्रा प्रकरणाचं उदाहरण देत केलेल्या एका वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. “भाजपाकडून महाविकास आघाडीतील नेत्यांवर सूडाने कारवाई केली जात आहे. केवळ भाजपाविरोधी पक्षातील नेत्यांवर ही कारवाई केली जात आहे. मग भाजपामध्ये काय सगळीच दुधाने धुतलेली लोकं आहेत का?” असा सवाल करत भाजपावर टीका करताना नाना पटोले यांनी राज कुंद्राबाबत एक वक्तव्य केलं आहे.
“राज कुंद्रा जर उद्या भाजपामध्ये गेले तर ज्या व्हिडीओमुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत ‘ते’ व्हिडीओ रामायणाचे आहेत असं भाजपा म्हणणार आहे काय?”, असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. दरम्यान, नाना पटोले यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. “भाजपामध्ये काय सगळीच दुधाने धुतलेली लोकं आहेत का? त्यांच्यापैकी कोणावरही भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत का? त्यांच्यापैकी कोणाकडेही भ्रष्ट मालमत्ता नाही का? आणि या सगळ्याची माहिती ईडी आणि सीबीआयकडे नाही का? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य लोकांनाही पडले आहेत”, असं यावेळी नाना पटोले म्हणाले.
स्वायत्त संस्थांचा गैरवापर
नाना पटोले यावेळी पुढे म्हणाले की, “केवळ भाजपाविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई होत असेल तर हे चुकीचं आहे. कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे. फक्त भाजपाचा विरोध केला म्हणून स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जाणार असेल तर हे चुकीचं आहे. त्याचप्रमाणे, ज्यांनी चुकीची कामं केली आहेत त्यांच्यावर कारवाई करायलाच पाहिजे. त्याबाबत दुमत असण्याचं कारण नाही.”
जावेद अख्तर बोलले त्यात काही वेगळं नाही…!
लोकप्रिय गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी RSS बाबत केलेल्या खळबळजनक विधानानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जावेद अख्तर यांनी हात जोडून माफी मागावी अशी मागणी एकीकडे होत असताना दुसरीकडे त्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी देखील भूमिका भाजपाने घेतली आहे. या मुद्द्यावर देखील नाना पटोले यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे.
“देशाचे पंतप्रधान हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत. म्हणूनच, देश विकला जात असताना, शेतकऱ्यांवर लाठीचार्ज होत असताना देखील जर आरएसएस काहीच बोलत नसेल आणि त्यावर जावेद अख्तर काही बोलत असतील तर त्यात काही वेगळं नाही. देशापेक्षा कोणतीही संघटना मोठी नसते. जर एखादी संघटना तसं समजत असेल तर हे देशासाठी अत्यंत हानिकारक आहे”, असं नाना पटोले म्हणाले.