Nana Patole Suspended for Ond Day: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानावरून आज विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस आमदार नाना पटोले व विरोधी बाकांवर बसलेल्या अनेक आमदारांनी घोषणाबाजी केली. खुद्द नाना पटोले अध्यक्षांच्या खुर्जीजवळ जाऊन राहुल नार्वेकर यांना जाब विचारू लागले. यावर मुख्यमंत्र्यांनी नाना पटोलेंच्या माफीची मागणी केली. यानंतर कामकाज चालू ठेवण्यासाठी म्हणून नाना पटोलेंचं दिवसभरासाठी निलंबन करत असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलं.
“मोदी तुमचा बाप असेल”
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेली काही विधानं गेल्या काही दिवसांमध्ये वादग्रस्त ठरली होती. या विधानाचा संदर्भ देत नाना पटोलेंनी विधानसभेत संताप व्यक्त केला. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबद्दल सभागृहात माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, त्यावेळी गोंधळ सुरू झाला.
“बबनराव लोणीकर व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांचा सातत्याने अपमान करत आहेत. हा अपमान अन्नदाता सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही”, असं नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, यावर असंसदीय शब्दांचा उल्लेख केल्याबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नाना पटोलेंना समज दिली. पण तेव्हाच नाना पटोले अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन तावातावाने बोलू लागले. यानंतर ५ मिनिटांसाठी सभागृह स्थगित करण्यात आलं. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी “माफी मागा, माफी मागा, शेतकऱ्यांची माफी मागा”, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली.
मुख्यमंत्र्यांनी केली माफीची मागणी
दरम्यान, राहुल नार्वेकरांनी वारंवार समज दिल्यानंतरदेखील नाना पटोले अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन वाद घालत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंच्या माफीची मागणी केली. “एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे. पण थेट अध्यक्षांवर धावून जाणं अशोभनीय आहे. जणूकाही अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीने अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदाच पाहतोय. लोकं वर गेले, नाही असं नाही. पण अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाही. नाना पटोले स्वत: अध्यक्ष राहिले आहेत. त्यांनी असं वागणं योग्य नाही. नाना पटोलेंनी माफी मागायला हवी”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नाना पटोलेंचं दिवसभरासाठी निलंबन करत असल्याचं जाहीर केलं. यावर पुन्हा एकदा विरोधकांनी सभागृहात गोंधळ व घोषणाबाजीला सुरुवात केली.
विरोधकांचा एक दिवसाचा सभात्याग
दरम्यान, नाना पटोलेंचं एक दिवसासाठी निलंबन झाल्यानंतर त्याचा निषेध म्हणून विरोधकांनी एक दिवसासाठी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. “महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं असेल की शेतकऱ्यांसाठी आवाज उठवण्यासाठी, शेतकऱ्यांच्या झालेल्या अवमानाविरोधात आवाज उठवण्यासाठी कुणीतरी निलंबित झालं आहे. आपण हा एक भयानक पायंडा पाडला आहे. महाराष्ट्राचं दुर्दैवं हे आहे की हे सरकार शेतकऱ्यांच्या नसून निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने आमच्या डोक्यावर बसलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेली वचनं न पाळता त्यांचा अपमान करून यांना सत्ताधारी बाकांवर बसता येतं हे आज निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने भाजपाने दाखवलं आहे. त्यामुळे नाना पटोलेंच्या निलंबनाचा निषेध म्हणून आम्ही आज एक दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे”, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली.