नांदेड : जिल्ह्यांत १६ तालुके, त्यामुळे विकास करताना कायमच अडचण. माहिती-तंत्रज्ञानाच्या संधी, विस्तारू पाहणारा हवाई मार्ग, नगदी पिकांसाठी हळूहळू विकसित होणाऱ्या सुविधांमुळे एकेक पाऊल सकारात्मकतेच्या दिशेने पडू लागले आहे. नांदेड जिल्ह्यातील केळी या नगदी व प्रमुख पिकासाठी आता केळी साठवण्यासाठी दोन शीतगृहे उभारण्यात आली आहेत. लेंडी सिंचन प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे.
नांदेड हे पंचक्रोशीत आरोग्य व शैक्षणिक प्रगतीचे केंद्र झाले आहे. सेवा उद्याोगांमुळे प्रगती दिसत असल्याने विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा दावा केला जात आहे. २०११ च्या जनगणनेनुसार नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या ३३ लाखांपेक्षा अधिक आहे. मुख्यालयापासून किनवट तालुका १५० कि.मी., तर या तालुक्यातील शेवटचे गाव सुमारे २०० किलोमीटर येते. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन व्हावे, अशी जुनी मागणी आहे. जिल्ह्याचे विभाजन, महसूल आयुक्तालय, पोलीस आयुक्तालय, स्वतंत्र वाहतूक शाखा नांदेडसह अन्य तीन तहसीलांचे विभाजन, सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था, असे किती तरी प्रस्ताव प्रलंबित आहेत. पुरेसे सिंचन प्रकल्प नसल्याने शेती आश्वासक नाही.
नांदेडसह जिल्ह्याच्या काही तालुक्यांत महाराष्ट्र राज्य औद्याोगिक विकास महामंडळाच्या वसाहती आहेत. कृष्णुर या वसाहतीत काही मोजके कारखाने आहेत. येथील २०० कोटी रुपयांचा सिट्रस ज्यूस हा उद्याोग नाशिकच्या एका उद्याोगसमूहाने अलीकडेच घेतला आहे. कीर्ती गोल्ड हा तेलनिर्मितीचा एक मोठा प्रकल्पवगळता अन्य लक्षणीय उद्याोग नाही. त्यामुळे रोजगाराच्या संधी फारशा उपलब्ध नाहीत. जिल्ह्यात महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाची ४९७.२८ हेक्टर जमीन आहे. पैकी ११०१ भूखंडांचे वाटप करण्यात आले.
कुपोषणावर मात करण्यात यश
शून्य ते पाच वर्षे वयोगटातील ९९.८८ टक्के बालकांचे वजन घेण्यात आले असता, तीव्र कमी वजनाची अर्थात कुपोषित बालकांचे प्रमाण ०.२१ टक्के आहे. मध्यम कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण १.३६ टक्के आहे. उपरोक्त वयोगटातील एकूण दोन लाख ६७ हजार २६ बालकांपैकी दोन लाख ६२ हजार ४९६ बालके सर्वसाधारण वजनाची आहेत. ही आकडेवारी पाहता कुपोषण निर्मूलनाबाबत नांदेड आरोग्य विभागाने चांगली कामगिरी नोंदवली आहे.
दृष्टिक्षेपात जिल्हा
● शिक्षण सुविधा – २८०४ प्रा. शाळा, ५५ माध्यमिक, ३२९ उच्च माध्यमिक संस्था, १३४ महाविद्यालये, ८ तंत्रनिकेतन, ४ अभियांत्रिकी, २५ आय.टी.आय.
● वैद्याकीय सेवा – श्री गुरुगोविंदसिंगजी शासकीय रुग्णालय, आयुर्वेद रुग्णालय, २४ शासकीय रुग्णालये, ६९ प्रा. आरोग्य केंद्रे, ३७८ उपकेंद्रे.
● रेल्वे – काचीगुडा-मनमाड आणि मुदखेड- अदिलाबाद मार्ग. एकूण लांबी २५९ किलोमीटर.
● सिंचन – दोन लाख एक हजार सात हेक्टर (एकूण क्षेत्राच्या तुलनेत २१.४६ टक्के)
● साक्षरता – (२०११ जनगणना) – ७५.४५ टक्के