नांदेड : भर रस्त्यातून एका १९ वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांविरुद्ध वजिराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत मुलीची सुखरूप सुटका केली, शिवाय दोन्ही आरोपींना जेरबंद केले. आरोपींपैकी एक जण अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले.
नांदेडमधील पक्की चाळ येथील रहिवासी असलेली एक १९ वर्षीय तरुणी रेल्वे स्थानक परिसरात भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवते. इतवारा परिसरातील मोहम्मद खाजा इरफान म. इरफान (वय २१) हिची त्याच्याशी ओळख होती. ते दोघे नेहमी एकमेकांशी बोलायचे; पण गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. बुधवारी सायंकाळी मोहम्मद खाजा म. इरफान याने आपल्या एका सहकाऱ्यासोबत त्या मुलीच्या अपहरणाचा डाव रचला. संध्याकाळी साडेसात वाजता रेल्वे स्थानक परिसरातून या दोघांनी त्या तरुणीला उचलून गाडीवर दामटून बसवत घेऊन गेले.
अपहरणासारखा हा प्रकार लक्षात आल्यानंतर, तसेच याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसृत झाल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी धावले. आवश्यक त्या सूचना करून पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी केली व अवघ्या दोन तासांत त्या मुलीची सुखरूप सुटका केली. संबंधित मुलगी जवाहरनगर येथे सापडली. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक कौशल्य वापरले. स्वत: सर्व वरिष्ठ अधिकारी संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. मुख्य आरोपी हा मिस्त्री काम करतो, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
गुरुवारी (दि. ३१) त्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून वजिराबाद पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, मुख्य आरोपी मोहम्मद खाजा म. इरफान याची रेल्वेस्थानक परिसरात पोलिसांनी धिंड काढली. दुसरा आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू होती.
आरोपी आणि फिर्यादी यांची जुनी ओळख आहे. त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. घटनेनंतर पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली. मुलीची सुखरूप सुटका करताना गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाला कोणताही जातीय रंग नाही. वजिराबाद पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व सायबर विभागातील कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली. मुख्य आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दुसऱ्या अल्पवयीन आरोपीवर कायद्यानुसार कार्यवाही सुरू आहे. – अबिनाशकुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड</strong>