नांदेड : महसूल विभागाच्या विभागीय व राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवादरम्यान गायन-वादन किंवा अन्य कला सादर करणारे अधिकारी-कर्मचारी सार्‍यांचीच दाद मिळवून जातात. पण बदली झाल्यानंतर खुर्चीवर बसून गायन कला सादर करण्याची कृती तहसीलदार प्रशांत थोरात यांना भोवली असून नांदेड जिल्हाधिकार्‍यांच्या अहवालावरून विभागीय आयुक्तांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

प्रशांत थोरात नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे कार्यरत होते. गेल्या महिन्यात त्यांची बदली लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे करण्यात आल्यानंतर ३० जुलै रोजी ते उमरी येथून कार्यमुक्त झाले होते. त्यानंतर उमरी तहसील कार्यालयातर्फे ८ ऑगस्ट रोजी त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभादरम्यान थोरात यांनी खुर्चीत बसून गाणे गायले. या प्रसंगाचा व्हीडीओ नंतर समाजमाध्यमांतून प्रसृत झाल्यावर त्यावर सामान्य नागरिक व राजकीय कार्यकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या.

थोरातांच्या गायनाचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नांदेडच्या जिल्हाधिकार्‍यांनी विभागीय आयुक्तांकडे अहवाल पाठविला होता. अंगविक्षेप व हातवारे करून थोरात यांनी शासकीय कर्मचार्‍याला अशोभनीय ठरेल, असे वर्तन केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यांची ही कृती बेजबाबदार ठरवून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९च्या कलम ४ (१) नुसार त्यांना विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी निलंबित केले. उमरीहून कार्यमुक्त झाल्यानंतर ते रेणापूर येथे रुजूही झाले होते.

निलंबन कालावधीमध्ये प्रशांत थोरात यांचे मुख्यालय धाराशिव राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले असून तेथील जिल्हाधिकार्‍यांच्या पूर्वसंमतीशिवाय मुख्यालय सोडू नये असे त्यांना बजावण्यात आले आहे. या कारवाईमुळे महसूल खात्यात एकच खळबळ उडाली.