नांदेड : काँग्रेसश्रेष्ठींनी मागील शतकात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी अचानकपणे श्रीमती प्रभा राव यांची नियुक्ती केल्यानंतर तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मानभंगाच्या मुद्यावरून आपल्या सर्वोच्च पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ४० वर्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्हास्तरावर शिवराज पाटील होटाळकर यांच्या नियुक्तीवरून पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार भास्कररावदादा खतगावकर यांचाही मानभंग झाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा नांदेड जिल्ह्यातील ‘लगाम’ आपल्या हाती घेणारे आ.प्रताप पाटील चिखलीकर यांनी गेल्या आठवड्यात पक्षाच्या जिल्हा संघटनेत काही बदल घडवून आणले. नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (दक्षिण)च्या अध्यक्षपदी त्यांनी नायगावच्या शिवराज पाटील होटाळकर यांना नियुक्तीपत्र बहाल केल्यानंतर लगेच खतगावकरदादांनी विरोध, नाराजी आणि या विषयात झालेला मानभंग तेथेच उघड केल्यानंतर चिखलीकरांचा चेहरा पडल्याचे वृत्तवाहिन्यांच्या कॅमेर्यांनी त्या दिवशी टिपले होते. स्थानिक आणि इतर प्रसिद्धीमाध्यमांनी वरील राजकीय घडामोडींना ठळक प्रसिद्धी दिली. याचनिमित्ताने वसंतदादा पाटील यांच्या तेव्हाच्या धाडसी राजकीय कृतीची आठवण समोर आली आहे. योगायोगाने आताच्या प्रकरणात ‘दादा’ या आदरार्थी नावाने ओळखले जाणारे नेतेच केंद्रस्थानी आहेत.
खतगावकर यांनी होटाळकर यांची नियुक्ती अमान्य केली आहे. या प्रकरणात चिखलीकरांकडून झालेली दिशाभूल त्यांच्यासमोर उघड करतानाच या नियुक्तीच्या विरोधात आपण पक्षनेत्यांना भेटणार आहोत, असे त्यांनी येथे जाहीर केले होते. पण त्यानंतर मुंबईतल्या घडामोडी मंगळवारी दुपारनंतर समोर आल्या. चिखलीकर यांनी होटाळकरांसह पूर्वाध्यक्षांनाही सोबत घेत पक्षाध्यक्ष अजितदादा पवार यांची भेट घेऊन येथे वादग्रस्त झालेल्या या नियुक्तीवर त्यांच्या मान्यतेची मोहोर लाऊन घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नांदेड जिल्हा दक्षिणच्या अध्यक्षांना बदलण्याचा विषय मागील काही आठवड्यांपासून विचाराधीन होता. ह्या विषयात खतगावकर आणि चिखलीकर यांनी एकत्र बसून सर्वमान्य नाव सुचवावे असे पक्षनेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आले होते; पण वयोमान तसेच मागील महिनाभरातील आजारपणामुळे खतगावकरांवर आलेल्या मर्यादांची संधी साधत चिखलीकर यांनी आपला ‘प्रताप’ दाखवून दिला. त्यामुळे खतगावकर अस्वस्थ झाले असले, तरी सकारात्मक प्रयत्नांतून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी चिखलीकर यांनी खतगावकरांआधीच पक्षाध्यक्षांची भेट घेऊन होटाळकरांच्या नियुक्तीला संरक्षण मिळवल्याचे दिसले.
विशेष म्हणजे या नियुक्तीवरून मावळते जिल्हाध्यक्ष दिलीप धर्माधिकारी आधी गुरगुरले होते; पण मंगळवारच्या अजितदादांच्या भेटीत तेही सहभागी झाले. खतगावकर समर्थक म्हणून ओळखले जाणारे अविनाश घाटे यांनी होटाळकरांची नियुक्ती जाहीर होताच ‘हे बरोबर नाही,’ असा सूर काढला होता. तथापि त्यांच्या सूतगिरणीच्या अर्थसाहाय्याच्या प्रस्तावाची भिस्त चिखलीकरांवर असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनीही ‘सूर’ आणि ‘राग’ बदलल्याचे दिसले. तेही चिखलीकरांसोबत अजित पवारांकडे होते. मुंबईत मंगळवारी घडलेल्या आणि छायाचित्रांतून समोर आलेल्या घडामोडी खतगावकर यांच्यासाठी उद्वेगजनक होत्या. दुर्दैवाने त्यांच्या गाठीशी कोणतेही पद नसल्यामुळे त्यांना या मानभंग प्रकरणात वसंतदादांचा बाणेदारपणा दाखवून देण्याची संधी नाही, असे बोलले जात आहे; पण यानिमित्ताने नांदेड जिल्हा राष्ट्रवादीतील बेबनाव आता अधिक गहिरा बनला आहे.
तटकरेंनी दौर्यातून नांदेडला टाळले !
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे गुरुवारपासून मराठवाड्याच्या दौर्यावर येत आहेत. पण नांदेड जिल्ह्यातील पक्षांतर्गत पेच त्यापूर्वीच समोर आल्यामुळे त्यांनी आपल्या दौरा कार्यक्रमांतून नांदेड जिल्ह्याला टाळले असल्याचे दिसते.
वाद पक्षाच्या हिताचा नाही-पोकर्णा
पक्षाचे ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर आणि आमदार चिखलीकर यांच्यातील वाद उघड झालाच आहे. तो पक्षाच्या हिताचा नाही. त्यातून तोडगा काढावा लागणार असल्याचे या पक्षाचे महानगराध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा यांनी म्हटले आहे.