देशात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. याच महिला दिनाचे औचित्य साधून नांदेडमध्ये महिला उत्थान मंडळाच्या वतीने आसाराम बापू यांच्या समर्थनार्थ आज ( ८ मार्च) मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. आसाराम बापू यांची सुटका करावी अशी मागणी या महिलांनी केली आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली आसाराम बापू सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. मात्र त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत, असा दावा त्यांचे अनुयायी करतात. बापूंची लवकरात लवकर सुटका करावी अशी मागणी या अनुयायांकडून केली जाते. महिला दिनाचे औचित्य साधून नांदेडमध्ये काही महिलांनी आसाराम बापू यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या महिलांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. तसेच आसाराम बापू निर्दोष असून एका मुलीच्या सांगण्यावरून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात कुठलाही ठोस पुरावा मिळालेला नाही. वयाकडे बघता आसाराम बापू यांना त्वरित मुक्त करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलीय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी मोर्चादरम्यान आसाराम बापूंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या महिलांच्या हातामध्ये वेगवेगळे फलक होते. “आज शांततापूर्वक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. खोटे षड्यंत्र रचून आसाराम बापू यांना फसवण्यात आले आहे. या खटल्याचा आपण अभ्यास केला तर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. बापू यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा नाही. ज्या मुलीने आरोप केलेले आहेत तिच्या वयासंदर्भातही ठोस पुरावा नाही. वैद्यकीय तपासणीचा अहवालदेखील नॉर्मल आहे. आमचे बापू निर्दोष आहेत. एक मुलगी आरोप करतेय म्हणून बापूंना निर्दोष ठरवले जातेय,” अशी प्रतिक्रिया आंदोलक महिलेने दिली. तसेच आसाराम बापूंची लवकरात लवकर सुटका करावी, अशी मागणी या महिलेने केली.