सावंतवाडी :सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा झाला. नारळाचे पूजन करून तो समुद्राला किंवा नदीला अर्पण करण्याची पारंपरिक प्रथा जिल्ह्यात सर्वत्र पाळली गेली.

सावंतवाडी येथे मोती तलावात नारळ अर्पण

सावंतवाडी शहरात दरवर्षीप्रमाणे येथील संस्थानकालीन मोती तलावात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली. सावंतवाडी संस्थानचे खेमसावंत भोसले आणि पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते मानाच्या सुवर्ण नारळाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सावंतवाडी पोलिसांच्या मिरवणुकीसह हा मानाचा नारळ मोती तलावात अर्पण करण्यात आला. यावेळी शेकडो सावंतवाडीकर नागरिक तलावाभोवती जमले होते.

बांद्यात तेरेखोल नदीला नारळ अर्पण

बांदा येथेही नारळी पौर्णिमा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली. परंपरेनुसार श्री बांदेश्वराची पालखी वाजतगाजत तेरेखोल नदीकडे रवाना झाली. मार्गात श्री विठ्ठल मंदिर आणि श्री पाटेश्वर मंदिराचे नारळही पालखीत ठेवण्यात आले. नदीवर पारंपरिक पूजा करून देवांचे नारळ नदीला अर्पण करण्यात आले. यावेळी बांदा शेर्ला पुलावर आणि नदीकाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नदीत नारळ गोळा करण्यासाठी अनेक नाविक आणि जलतरणपटू उपस्थित होते.

देवगडमध्ये समुद्राला नारळ अर्पण

देवगड तालुक्यातही नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली. या दिवशी खोल समुद्रातील मासेमारीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. देवगड, तारामुंबरी, मळई येथील समुद्रकिनारी नारळ अर्पण करण्यात आले. देवगड बंदरावर तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते शासकीय पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला. तसेच जामसंडे मळई खाडीकिनारी बाल मंडळ संगीत मेळा मळईतर्फे नारळाची पूजा करून नारळ अर्पण करण्यात आला. यानिमित्ताने मच्छिमारी नौका आकर्षक पताकांनी सजवण्यात आल्या होत्या.