सावंतवाडी : नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर मालवण शहरात महिलांसाठी तीन नारळ लढवण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध राजकीय पक्ष आणि संस्थांनी ८ ऑगस्ट रोजी या स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धा मालवण बंदर जेटी येथे होणार आहेत.

मालवणी संस्कृती व वारसा मंडळातर्फे दहावे वर्ष:

मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवण यांच्यातर्फे आयोजित ही स्पर्धा यंदा आपले दहावे वर्ष साजरे करत आहे. या स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिसे, जसे की सोन्या-चांदीचे दागिने, पैठणी, मोबाईल इत्यादी दिली जाणार आहेत. यासोबतच, दहा लाख रुपयांचा विमा आणि आयुर्वेदिक स्किन केअर किट ही विशेष बक्षिसे असतील. स्पर्धेमध्ये तीन वेळा प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या महिलेला ९ ग्रॅम सोन्याचा हार देऊन सन्मानित केले जाईल. पद्मश्री परशुराम गंगावणे, टीव्ही अभिनेते वीरेश कांबळी यांच्यासारख्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा दशकपूर्ती सोहळा साजरा होईल. या स्पर्धेसोबतच फुगडी, गोफ नृत्य, कोळी नृत्य आणि जादूचे प्रयोग असे विविध सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.

भाजपतर्फे रिक्षा रॅलीसह स्पर्धा:

भाजप मालवण तालुका यांच्यातर्फे महिलांसाठी नारळ लढवण्याची स्पर्धा त्याच दिवशी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. यात विजेत्यांना रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि फॅन अशी बक्षिसे दिली जातील. तसेच सहभागी महिलांसाठी लकी ड्रॉ काढला जाईल, ज्यात सोन्याची नथ आणि चांदीची बक्षिसे असतील. यासोबतच, भाजप मालवणतर्फे रिक्षा व्यवसायिकांसाठी पर्यटन सांस्कृतिक रॅली आणि रिक्षा सजावट स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट सजावट करणाऱ्या रिक्षा चालकाला दहा हजार रुपयांचे प्रथम बक्षीस मिळेल. या कार्यक्रमाचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते होणार आहे.

ठाकरे शिवसेना आणि बंड्या सरमळकर यांच्यावतीने स्पर्धा:

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि बंड्या सरमळकर यांच्यावतीने दुपारी ३ वाजता महिलांसाठी नारळ लढवण्याची स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेत प्रथम विजेत्याला सोन्याची नथ आणि पैठणी मिळेल, तर इतर विजेत्यांनाही आकर्षक बक्षिसे दिली जातील. या कार्यक्रमात सुरेल बँजो पार्टीचे खास वादन असणार आहे. १२ वर्षांखालील मुला-मुलींसाठी कोळी थीमवर वेशभूषा स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे. तिन्ही स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना नारळ आयोजकांकडून मोफत दिले जातील, असे आयोजकांनी सांगितले आहे.