scorecardresearch

“हे उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीचं सगळ्यात उत्तम काम”, स्मृतीस्थळ शुद्धीकरणावरुन नारायण राणेंचा संताप!

बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळाचं काही शिवसेना कार्यकर्त्यांनी शुद्धीकरण केल्यानंतर नारायण राणेंनी संताप व्यक्त केला आहे.

narayan rane on uddhav thackeray
नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजपासून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. मुंबईपासून त्यांनी सुरुवात केली असून यादरम्यान त्यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला देखील भेट दिली. मात्र, नारायण राणे भेट देऊन गेल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं. या मुद्द्यावरून आता नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. “उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीचं सगळ्यात उत्तम काम आहे हे शुद्धीकरण करणं”, अशा शब्दांत नारायण राणेंनी आपला संताप व्यक्त केला आहे. एबीपीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“…त्याशिवाय ते काहीही करू शकत नाही”

नारायण राणे यांनी आज दिवसभर मुंबईत विविध ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यावर सडकून टीका केली आहे. मात्र, संध्याकाळी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर काही शिवसेना कार्यकर्त्यांनी शुद्धीकरण केलं. यासंदर्भात विचारणा केली असता नारायण राणेंनी त्यावर तीव्र संताप व्यक्त केला. “उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीचं सगळ्यात उत्तम काम आहे हे शुद्धीकरण करणं. दुसरं ते काहीही करू शकत नाही”, अशा शब्दांत नारायण राणेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं होतं. मात्र, नारायण राणे या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर तिथे शिवसेना कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचं दुधानं शुद्धीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राज्यात नवा राजकीय वाद उभा राहण्याची शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे केअर टेकर आप्पा पाटील यांनी स्मृतीस्थळावर आधी दुग्धाभिषेक, त्यानंतर गोमूत्राने हे शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर तिथे फुलं वाहण्यात आली आहेत.

“राणेंना इतक्या वर्षांत बाळासाहेब दिसले नाहीत”

आप्पा पाटील यांनी यावेळी नारायण राणे यांच्यावर देखील टीका केली आहे. “आज ही वास्तू अपवित्र झाली. तिथे दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण केलं. बाळासाहेबांची फ्रेम पाण्याने धुवून तिच्यावर दुग्धाभिषेक केला. त्यानंतर बाळासाहेबांना आवडणारी चाफ्याची फुलं तिथे वाहिली आहे. त्यांना आज शिवसेना दिसली. इतक्या वर्षात शिवसेना सोडून गेल्यानंतर त्यांना बाळासाहेब दिसले नव्हते. देशाच्या टॉप ५ मध्ये असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ते काहीही बोलत होते. आम्ही ठाकरे कुटुंबाबद्दल निष्ठा राखणारे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही हे सहन करू शकत नाही. म्हणून आम्ही हे शुद्धीकरण केलं आहे. मी रोज इथे येतो”, अशी प्रतिक्रिया हे शुद्धीकरण करणारे शिवसेना कार्यकर्ते आप्पा पाटील यांनी दिली आहे.

शिवसेनेचंच शुद्धीकरण करावं लागेल – आशिष शेलार

Video : नारायण राणे येऊन गेल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शिवसैनिकांकडून शुद्धीकरण!

राणेंच्या स्मृतीस्थळावर येण्याला होता विरोध

केंद्रीय मंत्री नारायण राणे जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट देणार असल्याचं जाहीर झाल्यानंतर शिवसेनेतून त्याला विरोध करण्यात आला होता. खासदार विनायक राऊत यांनी राणेंना स्मृतीस्थळाच्या ठिकाणी पाऊल ठेऊ देणार नाही, अशी घोषणा देखील केली होती. मात्र, त्यानंतर वातावरण निवळलं आणि राणेंनी विनासायास स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-08-2021 at 20:01 IST