Narayan Rane : भाजपा नेते आणि खासदार नारायण राणे यांना मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नारायण राणेंवर नेमकी कोणती शस्त्रक्रिया होणार हे अद्याप समोर आलेलं नाही. आमदार रोहित पवार यांनी नारायण राणेंना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यासंदर्भातली पोस्ट केली आहे.
काय आहे रोहित पवारांची पोस्ट?
“ज्येष्ठ नेते नारायण राणे साहेब यांना जसलोक रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समजली. राणे साहेब तब्येतीची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा, माझ्या सदिच्छा आपल्यासोबत आहेत.”
नारायण राणे माजी केंद्रीय मंत्री
नारायण राणे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते काही काळ राज्याचे मुख्यमंत्रीही राहिलेले आहेत. आधी ते कट्टर शिवसैनिक होते, त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कालांतराने ते भाजपमध्ये सामील झाले. ते काही काळ केंद्रिय मंत्रीही होते. त्याची दोन्ही मुले नितेश आणि निलेश राणे हे आमदार आहेत. नितेश राणे हे राज्य सरकारमध्ये मंत्रीही आहेत. नारायण राणे हे उद्धव ठाकरे यांचे कट्टर विरोधक आहेत. ते नेहमी शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. नारायण राणे हे आपल्या फटकळ भाषेसाठीही ओळखले जातात. आता त्यांना शस्त्रक्रियेसाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.