राज्यसभा निवडणुकीत भाजपाने पुरेसं संख्याबळ नसतानाही तिसरा उमेदवार निवडून आणला. त्यानंतर रविवारी (१२ जून) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. “सत्तेत असूनही शिवसेनेला जेवढी मतं मिळायला हवी होती तेवढीही मिळाली नाही. आम्ही विरोधात असूनही मविआची ८-९ मतं फोडली,” असं नारायण राणे म्हणाले. ते सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नारायण राणे म्हणाले, “शिवसेनेला सत्तेत असूनही महाविकास आघाडीची जेवढी मते मिळायला हवी होती तेवढीही मते मिळाली नाहीत. त्यांचे ८-९ आमदार फुटतात. त्यांची विश्वासार्हता कुठे आहे? आम्ही विरोधात असूनही एकसंध राहिलो. उलट आम्ही त्यांचीच मते फोडली. राज्यात सत्तेत येण्यासाठी १४५ मतांची आवश्यकता असते. मात्र, या निकालाने तुम्ही अल्पमतात गेला आहात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.”

“निवडणुकीपर्यंत आमचेच आमदार निवडून येतील, अशा बढाया मारणाऱ्यांचे या निवडणुकीने पानिपत केले. राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे पात्र नाहीत, हेच या निकालातून अधोरेखित झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन सत्तेतून पायउतार व्हायला हवे,” अशी टीका नारायण राणे यांनी केली.

“प्रामाणिकपणामुळे भाजपा विजयी”

“आमदारांची भाजपावर असलेली निष्ठा आणि प्रामाणिकपणामुळे राज्यसभेची ही निवडणूक भाजपा जिंकली, असं मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, “निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे जे नेते वाघाप्रमाणे डरकाळी फोडत होते, ते प्रत्यक्षात शेळीही नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसाठी जी भाषा वापरली नाही, तशी भाषा उद्धव ठाकरे यांनी वापरली. मात्र, निकालानंतर त्यांच्यावर आता नामुष्की ओढावली आहे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभणे, हे राज्याचे दुर्दैव आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane criticize shivsena mva over rajya sabha election pbs
First published on: 12-06-2022 at 14:04 IST