एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंमधील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शिंदेंनी शिवसेनेच्या ४० आमदारांसोबत बंडखोरी केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली. परिणामी शिंदे गटातील आमदारांना उद्धव ठाकरेंनी गद्दार नावाची पावती दिली आहे. यावरुनच भाजपा नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “गद्दारी शिंदे गटाने नाही तर उद्धव ठाकरेंनी केली”, असा आरेप नारायण राणेंनी केला आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष मोदी एक्सप्रेसची सोय करण्यात आली आहे. भाजपा नेते नारायण राणे यांनी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखला. त्यावेळी राणेंनी हे विधान केलं आहे.

हेही वाचा- “उद्धव ठाकरे खरंच हिंदुत्ववादी राहिले नाहीत, त्यांनी…”, भाजपा प्रदेशाध्यक्षांचा शिवसेना पक्षप्रमुखांना खोचक टोला!

उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली

“घरात बसून मुख्यमंत्री पद हाताळता येत नाही. उद्धव ठाकरेंच्या काळात किमान १० वर्षे महाराष्ट्र मागे गेला. आमदार आणि पक्षासोबत खरी गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली. मुख्यमंत्रीपद गद्दारी करुन मिळवलं. आमदारांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. गणरायाच्या कृपेने महाविकास आघाडीचे सरकार गेलं आणि नवीन सरकार आलं. भारतीय जनता पक्षाची केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे. त्यामुळे महाराष्ट्र सगळ्या बाजूने विकास करेल”, अशी आशा राणेंनी व्यक्त केली.

हेही वाचा- “आम्हाला कमी बॉलवर जास्त रन काढायचे”, एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्या नादात…”

शिंदे गटचं खरी शिवसेना

तर दुसरीकडे शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यावरुनही दोन्ही गटात चांगलाच वाद सुरु झाला आहे. शिवसेनेकडून दसरा मेळावा घेण्यासाठी महानगरपालिकेकडे पत्र दिलं आहे. मात्र, अद्याप महानगरपालिकेकडून अद्याप कोणतीही परवानगी देण्यात आली नाही. यावरुनच नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. “सरकार गेलं म्हणजे शिवसेना गेली. शिंदे गटाकडे शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार आहेत. उद्धव ठाकरेंकडे उरलेले आमदारही लवकरच जातील. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे आता बोलण्यासारखं काहीही राहिलेलं नाही. ते शिवतीर्थावर काय बोलणार. उद्धव ठाकरेंची शिवसेना संपलेली आहे. आता शिंदे हीच खरी शिवसेना” असल्याचे विधान राणेंनी केलं आहे.