मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मेट्रो ३ च्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवताना आम्हाला कमी चेंडूत जास्त धावा करायच्या असल्याचं वक्तव्य केलं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने खोचक टोला लगावला आहे. “कमी चेंडूत जास्त धावा करायच्या नादात हे ईडी सरकार लवकरच ‘धावबाद’ होईल,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला.

राजकीय लालसेपोटी ‘ईडी’ सरकारकडून चुकीचे धोरण स्वीकारले जात नाही ना अशी शंका महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली आहे, असेही महेश तपासे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरातच्या हितासाठी ‘बुलेट ट्रेन’चा निर्णय तत्परतेने घेतात. परंतु, महाराष्ट्रातल्या अनेक विषयांवर निर्णय होत नाही, असा या या ईडी सरकारचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ आहे, असा आरोप महेश तपासेंनी केला.

एकीकडे सरकारच्या संवैधानिकतेबाबतचा न्यायालयीन खटला, दुसरीकडे नैराश्यग्रस्त बंडखोर आमदार, तिसरीकडे ठाकरे गटाला मिळणारा जनप्रतिसाद आणि त्यावर ‘सी वोटर’चा लोकसभा निवडणुकीबाबतचा सर्वे या सर्व बाबींमुळे ईडी सरकार वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये आहे, अशी घणाघाती टीका महेश तपासे यांनी केली.

हेही वाचा : “आम्हाला कमी बॉलवर जास्त रन काढायचे आहेत”, मुंबई मेट्रो ३ च्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टोलेबाजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्हाला कमी चेंडूत जास्त धावा करायच्या नादात असल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिली आहे. त्यामुळे विश्वासघाताच्या आधारावर स्थापन झालेलं शिंदे सरकार जास्त काळ टिकेल, असं वाटत नाही, असंही महेश तपासे म्हणाले.