काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून केला होता. यावरुनच भाजपा नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “राज्यातले सरकार हे कंत्राटी सरकार नसून कायमस्वरूप सरकार आहे. कंत्राटी सरकार गणरायाने येण्यापूर्वीच रद्द केलं.”, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची निवृत्तीची वेळ जवळ आली असल्याचेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “अमोल मिटकरी रोज दाढीला तेल लावून…”, संजय राऊतांचं नाव घेत शहाजीबापू पाटलांची टोलेबाजी!

काय म्हणाले नारायण राणे?

“उद्धव ठाकरे यांची निवृत्तीची वेळ जवळ आली आहे. यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांना कंत्राटी मुख्यमंत्री म्हटले होते. मात्र, राज्यातले सरकार हे कंत्राटी सरकार नसून कायमस्वरूप सरकार आहे. कंत्राटी सरकार गणरायाने येण्यापूर्वीच रद्द केलं आणि कंत्राटदारांना हाकलून लावले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी घरात गप्प बसावे”, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. अडीच वर्ष राज्यावर जे संकट होतं ते संकट दूर करून गणरायाचे आगमन झाले आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “पुण्याला कुणीच वाली राहिला नाही”, नीलम गोऱ्हेंच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई मनपावरूनही उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई मनपावरूनही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. “मुंबई मनपा आता १ वर्ष त्यांच्या हातात आहे. मात्र, त्यांच्याकडून मुंबईचं भलं होणार नाही. मुंबईला अगदी बकाल करून ठेवले आहे. टक्केवारीने मुंबईचे नुकसान केले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मुंबई मनपात सत्ता परिवर्तन होईल. आम्ही मुंबई मनपावर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवू ”, असेही ते म्हणाले.

“घरात बसून मुख्यमंत्री पद हाताळता येत नाही”

दरम्यान, सकाळी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष मोदी एक्सप्रेसची सोय करण्यात आली होती. भाजपा नेते नारायण राणे यांनी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखला. त्यावेळीही राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. “घरात बसून मुख्यमंत्री पद हाताळता येत नाही. उद्धव ठाकरेंच्या काळात किमान १० वर्षे महाराष्ट्र मागे गेला. आमदार आणि पक्षासोबत खरी गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली. मुख्यमंत्रीपद गद्दारी करुन मिळवलं. आमदारांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. गणरायाच्या कृपेने महाविकास आघाडीचे सरकार गेलं आणि नवीन सरकार आलं”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “‘लाव रे तो व्हिडीओ’वाले राज ठाकरे खरे होते, आता मात्र…”, काँग्रेसची टीका

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना त्यांचा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री असा केला होता. तसेच, दुसऱ्या पक्षातून आमदार-खासदार चोरणं हाच यांचा एककलमी कार्यक्रम झालाय, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली होती. “यांचा एककलमी कार्यक्रम आहे की दुसऱ्या पक्षातून नेते आणा..आमदार-खासदार आणा. तेही पुरत नाहीत म्हणून दुसऱ्या पक्षातून पक्षप्रमुख चोरा. स्वत:ला स्वप्नंही पडत नाहीत. त्यामुळे दुसऱ्यांची स्वप्नंही चोरा”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane criticized uddhav thackeray on contract cm statement spb
First published on: 31-08-2022 at 18:11 IST