मुंबई गोवा महामार्गावर खड्डे पडल्याने आणि चिखल उडत असल्याने नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा रोष उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना सहन करावा लागला. आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदीवरच्या पुलाला बांधलं आणि त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या. दरम्यान नितेश राणे यांचे वडील आणि राज्यसभा खासदार नाराय़ण राणे ही अत्यंत चुकीची कृती असल्याचं म्हटलं आहे. माझं याला अजिबात समर्थन नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

खड्ड्यांमुळे नितेश राणेंचा ‘स्वाभिमान’ दुखावला, उप अभियंत्यावर चिखलफेक

‘हे वागणं अत्यंत चुकीचं आहे. महामार्गाच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणं योग्य आहे, पण त्याच्या समर्थकांनी अशाप्रकारे हिंसा करणं चुकीचं आहे. मी याला समर्थन देत नाही’, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण –
मुंबई गोवा महामार्गावर खड्डे पडल्याने आणि चिखल उडत असल्याने नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदीवरच्या पुलाला बांधलं आणि त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या.

नितेश राणे यांनी संतापलेल्या स्वरातच उप अभियंत्याला खड्ड्यांबद्दल जाब विचारला. लोकांच्या अंगावर चिखल उडतो तो तुम्हाला दिसत नाही का? रस्त्यावर पडलेले खड्डे तुम्हाला दिसत नाही का? चिखल उडाल्यावर कसं वाटतं तुम्हीच बघा असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचा चिखल ओतायचा आदेश दिला. त्यानंतर तातडीने दोन-चार कार्यकर्त्यांनी उप अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या डोक्यावर चिखलाने भरलेल्या बादल्या रिकाम्या केल्या.

प्रकाश शेडेकर यांना गडनदी पुलाला बांधूनही ठेवलं. सामान्य माणसांना जो त्रास सहन करावा लागतो तो आज तुम्हीपण करा असं म्हणत त्यांच्यावर चिखलफेक करण्यात आली. कणकवली तुंबवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? असाही प्रश्न नितेश राणेंनी विचारला. नितेश राणे आणि स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांनी गडनदी पूल ते जाणवली पूल इथवर पायी चालत नेलं आणि वस्तुस्थिती दाखवली. तसेच शेडेकर यांना धक्काबुक्कीही करण्यात आली.