शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज (२३ जानेवारी) विधानभवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच अन्य महत्त्वाच्या नेत्यांनी भाषण करत बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते नारायण राणे यांनीदेखील आपल्या भाषणात बाळासाहेबांसोबतचे वेगवेगळे किस्से सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना पक्ष सोडताना बाळासाहेबांचा फोन आला होता, असे सांगितले. तसेच त्यावेळी काय घडले होते, याचाही ओझरता उल्लेख नारायण राणे यांनी केला.
हेही वाचा >>> संजय राऊतांचे शिंदे गटावर टीकास्र; बाळासाहेबांचा संदर्भ देत म्हणाले, “बंडखोरी केलेले ४० दगड …”
देशाचे पंतप्रधानही त्यांच्याकडे यायचे
“मी देशात बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा दुसरा माणूस पाहिला नाही. त्यांच्याकडे कोणतंही पद नव्हतं. मात्र देशाचे पंतप्रधानही त्यांच्याकडे यायचे. मोठे नेते त्यांची भेट घ्यायचे. कौतूक करायचे, प्रेम करायचे. सत्ता नसतानाही एवढे कौतुक, मान, सन्मान मिळणारे बाळासाहेब ठाकरे हे एकमेव होते,” असे नारायण राणे म्हणाले.
हेही वाचा >>> “नातू आहे म्हणजे अक्कल आली असं होत नाही,” संजय शिरसाट आदित्य ठाकरेंवर संतापले; म्हणाले, “त्यांना गल्लीत…”
बाळासाहेब ठाकरे माझं नेहमी कौतुक करायचे
“कोकणातून मुंबईत येताना एवढं काही मिळेल असं वाटलं नव्हतं. शाखाप्रमुख, नगरसेवक, बीएसटीचे चेअरमनपद, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता अशी वेगवेगळी पदं मला बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. बाळासाहेब ठाकरे माझं नेहमी कौतुक करायचे. मात्र शेवटी मी काही निर्णय घेतले. शेवटी शेवटी मी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांना दु:ख दिलं. त्याला कारणंही तशीच होती,” असे नारायण राणे यांनी सांगितले.
हेही वाचा >>> “…तर अजिबात सोडायचं नाही,” राज्यपाल कोश्यारींच्या राजीनाम्यावर बोलताना उद्धव ठाकरे कडाडले; म्हणाले, “हा माणूस…”
ते म्हणाले चिडू नकोस, विचार कर
“त्यावेळी मला बाळासाहेब ठाकरे यांनी दुसऱ्या दिवशी फोन केला होता. ते म्हणाले नारायण उठलास का. मी म्हणालो हो साहेब. ते म्हणाले चिडू नकोस. विचार कर. परत ये. मी मात्र काहीही बोलू शकलो नाही. त्यांना उत्तर देऊ शकलो नाही. ते ठीक आहे म्हणाले आणि त्यांनी फोन ठेवला,” अशी आठवण नारायण राणे यांनी सांगितली.
हेही वाचा >>> ठाकरे गट-वंचित युती लवकरच तुटणार? उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत संजय शिरसाट यांचा मोठा दावा; म्हणाले “मला मनापासून…”
दरम्यान, तैलचित्र अनावरणाच्या या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर बाळासाहेबांची विनोदबुद्धी, मराठीसाठी असलेला कळवळा हे सांगताना बाळासाहेबांसोबत झालेला संवाद आणि आठवणी सांगितल्या.