भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे हे खोक्यांचे व्यवहार करत असतानाचे अनेक कॅसेट आपल्याकडे आहेत, असा दावा नारायण राणे यांनी केला. या सर्व क्लिप्सचा वापर आपण योग्यवेळी करू, असंही नारायण राणे म्हणाले. ते नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत साधत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘शिवसेना सोडलेले सगळे नेते संपतील पण शिवसेना संपणार नाही’ या दाव्याबाबत विचारलं असता नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरे दावा करतात, पण त्यांच्याकडे आता काहीही शिल्लक राहिलं नाही. त्यांच्याकडे १५ आमदार आहेत, पण ते आमदार आगामी निवडणुकीपर्यंत सोबत राहतील की नाही? हे माहीत नाही, अशा शब्दांत राणेंनी टीका केली.

हेही वाचा- “माझ्या नादी लागू नका, नाहीतर पुण्यात येऊन…”, नारायण राणेंचा अजित पवारांना थेट इशारा!

यावेळी नारायण राणे म्हणाले, “दावा सगळेच करत असतात. पण स्वत: दावा करून काहीही उपयोग नाही. राज्यातील जनतेनं दावा करायला हवा. उद्धव ठाकरे बोलतात, पण त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिलं नाही. त्यांच्याकडे १५ आमदार आहेत, पण ते आमदारही आगामी निवडणुकीपर्यंत त्यांच्याकडे राहतील की नाही? हे माहीत नाही. त्यांना कुठलंही अस्तित्व राहिलं नाही. त्यांना सोडून गेलेली लोक त्यांच्याबद्दल काय बोलतात? याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं. “

हेही वाचा- “रवींद्र धंगेकरांची उमेदवारी रद्द करा”; भाजपाची निवडणूक आयोगाकडे मागणी, नेमकं कारण काय?

माझ्याकडे उद्धव ठाकरेंच्या संभाषणाच्या अनेक कॅसेट्स- नारायण राणे

नारायण राणे पुढे म्हणाले, “माझ्याकडे उद्धव ठाकरेंच्या संभाषणाच्या अनेक कॅसेट आल्या. पण मी त्यातील एकाचाही उपयोग नाही केला. ते शिंदे गटातील आमदारांना खोके-खोके म्हणतात. पण उद्धव ठाकरे स्वत: खोक्यांचे व्यवहार करातानाचे कॅसेट माझ्याकडे आले आहेत. गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी केवळ खोके जमवले की काही पवित्र कामही केलं, याचं आत्मपरीक्षण करावं.” सगळ्या क्लिप्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार नाही. पण याचा योग्यवेळी वापर करेन, असंही नारायण राणे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane serious allegations on uddhav thackeray about taking crores of rupees audio clips rmm
First published on: 25-02-2023 at 18:49 IST