शिवसेना आणि भाजपा यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचे वेगळेच फटाके सध्या राज्याच्या राजकारणात फुटताना पाहायला मिळत आहे. आणि त्यात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. नारायण राणेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुद्द्यांवर भूमिका मांडली. यावेळी बोलताना त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींवरून त्यांनी या दोघांना लक्ष्य करतानाच राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर देखील बोचरी टीका केली आहे.

बारामतीच्या फटाक्यात आवाजही नाही आणि धूरही नाही

यावेळी बोलताना नारायण राणेंनी काही दिवसांपूर्वी बारामतीत झालेल्या इन्क्युबेशन सेंटर उद्घाटन कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणावरून निशाणा साधला. “मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की फटाके वाजवा पण धूर सोडू नका आणि आवाजही करू नका. असे फटाके फक्त आघाडी सरकारच्याच दुकानात मिळतात. असाच एक धूर बारामतीला सोडण्यात आला. त्याला आवाजही नव्हता, धूरही नव्हता, फक्त वास होता. त्यामुळे लोक परत एकदा प्रदूषणाधीन झाले आहेत”, असं राणे म्हणाले आहेत.

“रात्री करायचं ते दिवसा केल्यामुळेच…”

दरम्यान, यावेळी नारायण राणेंनी संजय राऊतांना देखील टोला लगावला. “गेले दोन दिवस संजय राऊतांचा अग्रलेख मी वाचला. देशात विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. यात एक जागा दादरा-नगर हवेलीची अपक्ष उमेदवाराने जिंकली. शिवसेनेने डंका सुरू केला की राज्याच्या बाहेर आम्ही जिंकलो. मुद्दाम मी त्या उमेदवाराची निशाणी मागवून घेतली. ती फलंदाज बॅट घेऊन उभा असल्याची आहे. पण दुसऱ्यांच्या मुलाचे बारसे करायची सवय शिवसेनेला आहेच. कमला डेलकर निवडून आल्या. त्याबद्दल शिवसेना आम्हाला यश मिळालं, आता दिल्ली काबीज करणार म्हणतायत. लिखान करताना त्या व्यक्तीला भान नसेल. रात्री जे करायचं ते दिवसा केल्यामुळे संजय राऊतांबाबत असा परिणाम होतोय का हे मला माहीत नाही”, असं नारायण राणे म्हणाले.

GST : शरद पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “ज्यांना काही समजतच नाही अशी मंडळी…!”

निवडणुकीपूर्वीची उद्धव ठाकरेंची विधानं…

“उद्धव ठाकरेंनी हे सरकार बनण्याआधी पवारांबद्दल जे उद्गार काढले हे सांगतो. ‘पवारांना विनंती आहे की धरणाच्या आत अजित पवारांना नेऊ नका. काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक म्हणजे अर्धवट मेंदूचे लोक आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे रिकामे डबके. सोनिया गांधींनी काढून टाकल्यानंतर तुम्ही पुन्हा लाचारीने त्यांच्याकडे गेलात. शरद पवारांसारखा लाचारपणा आमच्या रक्तात नाही. अजित पवारांचे रडणे म्हणजे मगरीचे अश्रू. नशीब महाभारतात शरद पवार नव्हते नाहीतर तिथेही फोडाफोडी केली असती’ ही विधानं उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी केली होती. आता मुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून निष्ठा विकली”, असं नारायण राणे यावेळी म्हणाले.