शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यानंतर शिवसेना-भाजपमधील वाकयुद्ध सुरुच आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. आता कोकणातील शिवसेना नेत्यानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. कोण नरेंद्र मोदी? बाळासाहेब ठाकरे नसते तर त्यांचं अस्तित्व केव्हाच संपलं असतं अशी टीका कोकणातील शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी सावर्डे येथील एका मेळाव्यात बोलताना केली आहे.

“काल उद्धव ठाकरेंनी एक भाषण केले आणि भाजपाच्या लोकांची कोल्हेकुई सुरु झाली आहे. त्यांनतर भाजपाचे सर्व नेते तुटून पडले आहेत. फक्त मराठी माणसेच भ्रष्टाचारी आहेत का? भाजपाचे षडयंत्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. फक्त मराठी माणसांवरच कारवाई करता. यापूर्वी ईडी, एनसीबी, सीबीआय नव्हती का? जरा विरोधात बोलले की चौकशी लावतात. मराठी माणसाला संपवण्याचे काम सुरु आहे. हे केवळ मुंबई महानगर पालिका ताब्यात घेण्याकरता सुरु आहे. ७० वर्षे काँग्रेसने राज्य केले पण त्यांनी कधी शिवसेना भवनाबद्दल कधी वाईट शब्द काढला नाही,” असे भास्कर जाधव म्हणाले.

हे भाजपावाले शिवसेनेचे बोट धरून आज महाराष्ट्रात मोठे झाले. शिवसेना प्रमुखांमुळे देशामध्ये भाजपा मोठी झाली आहे. सोशल मिडीयावर आमच्या नरेंद्र मोदींचा फोटो लावून शिवसेनेवाले निवडणून आले म्हणून सांगतात. कोण नरेंद्र मोदी? १९८४ साली महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसोबत युती केली तेव्हा फक्त बाळासाहेबांच्या फोटोवर तुम्ही मोठे झालात, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

“गुजरात दंगलीनंतर नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्याच्या निर्णयासाठी  लालकृष्ण अडवाणी बाळासाहेबांना भेटायला आले. बाळासाहेबांनी वाटेल ते झाले तरी चालेल नरेंद्र मोदींना बदलायचे नाही असे म्हटले. बाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत नाहीतर त्या दिवशीच घरी गेले असते. बाळासाहेबांचे फोटो लावून तुम्ही तुमचा पक्ष वाढवलात,” असे भास्कर जाधव म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आज राष्ट्रवादी काँग्रेससोबत उद्ध ठाकरेंनी सरकार केले तर ते म्हणतात आमच्या पाठीत खंजीर खुपसला. काल म्हणाले बेईमानी सरकार. एक महिना सरकार होत नव्हतं. चर्चा सुरु होती. शिवसेना पहिल्यांदा राष्ट्रवादी सोबत गेली की भाजपा? ८०  तासांचं सरकरा कोणी बनवले? राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी केंद्रातील मंत्र्यांची बैठक घेतली होती. रातोरात सरकार बनवून तुम्ही शिवसेनेला फसवल. तुम्ही खणलेल्या खड्ड्यामध्ये तुम्हालाच पडावं लागलं ही बाळासाहेबांची पुण्याई आहे,” असे भास्कर जाधव म्हणाले.