या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याचे थोतांड रचत भारतीय जनता पक्ष राज्यात आणि देशात आंदोलनाची नौटंकी करीत आहे. ओबीसी समाजाबद्दल भाजपाला किती प्रेम आहे हे दिसून आलेले आहे. नीरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या, अदानी हे ओबीसींचे नाहीत, त्यांचा पुळका भाजपाला येण्याचे काय कारण? ओबीसी समाजाला लुटून मुठभर मित्रांना देण्यासाठी ओबीसी समाजाने नरेंद्र मोदींना सत्तेत बसवलेले नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या राहुल गांधी यांच्याविरोधातील आंदोलनाचा समाचार घेत नाना पटोले पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी ओबीसींचा अपमान केला हा भाजपाचा आरोप हास्यास्पद असून, राहुल गांधी यांची नाहक बदनामी करण्याचा हा असफल प्रयत्न आहे. देशाला लुटणारे विजय माल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी, अदानी हे काही ओबींसीचे नाहीत. या भ्रष्ट लोकांचे भाजपा समर्थन करत आहे. चोरांना साथ देणारे कोण असतात ते लोकांना कळते. जीएसटीसारखा गब्बरसिंग टॅक्स आणून मोदी सरकार ओबीसींना लुटत आहे. भारतीय जनता पक्ष ओबीसी समाजाला फक्त मतदानापुरतेच वापरतो आणि नंतर वाऱ्यावर सोडून देतो. त्यामुळे ओबीसी समाजाच्या नावाखाली भारतीय जनता पक्षाने सुरू केलेले आंदोलन ही केवळ नौटंकी असून, भाजपाचे हे आंदोलन म्हणजे, ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’, असा प्रकार आहे.

मोदी सरकारच्या काळात देशात महागाई आणि बेरोजगारी प्रचंड वाढली, त्याचा फटका ओबीसी समाजालाही बसतो. ओबीसींची मते घेऊन भाजपा आणि मोदी सरकार देशाला मनुवादाकडे घेऊन जाण्याचे काम करीत आहे. एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडियातील जनतेच्या कष्टाचा पैसा अदानी लुटत होता, तेव्हा मोदी गप्प का बसले होते? हा पैसा ओबीसी समाजातील लोकांचा नव्हता का? राहुल गांधी भ्रष्टाचारी, अत्याचारी, मोदी सरकारविरोधात आवाज उठवत असतात म्हणूनच तो आवाज दाबण्याचे काम भाजपा सरकारकडून करत आहे. बहुमताच्या जोरावर मोदी सरकारने लोकसभा सदस्यत्व रद्द करून लोकशाहीचा खून केला. मोदी सरकारने आवाज दडपण्याचा कितीही प्रयत्न केला तरी काँग्रेस पक्ष अशा दडपशाहीला भीक घालत नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi was not put in power to loot obcs and give them to a handful of friends says nana patole vrd
First published on: 25-03-2023 at 15:45 IST