कराड : मराठा समाजासाठी महत्त्वपूर्ण असणारी ‘सारथी संस्था’ व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ’ पद्धतशीरपणे, टप्याटप्प्याने कमजोर करून बंद करण्याचे षङ्यंत्र सुरू आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज प्रकरणांसाठी इच्छुक असणाऱ्यांना ९ ऑक्टोबरपासून पात्रता प्रमाणपत्र (एलवाय) देणे बंद केले आहे. हा त्याचाच एक भाग असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या (सोमवारी) भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कराडमध्ये माजी उपपंतप्रधान, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांसमवेत अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. नरेंद्र पाटील म्हणाले, ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत दीड लाखावर मराठा उद्योजक बनवण्यात यश आले. भविष्यात हे प्रमाण पाच लाखांवर नेण्याचे धोरण आहे. मात्र, इच्छुक कर्जदारांना पात्रता प्रमाणपत्र देणे महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बंद केल्याने गोंधळाची स्थिती आहे.

मी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दोन-तीनदा पत्रव्यवहार करून प्रमाणपत्र देणे का बंद आहे, हे विचारले असता सॉफ्टवेअरमधील दोष असे एकदा सांगण्यात आले. पुन्हा केलेल्या पत्रव्यवहाराला उत्तरच मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर नेमका कोणाचा दबाव आहे, त्यांना नेमक्या कुणी काय सूचना दिल्या आहेत का, याबाबत माहिती घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातीलच काही मंत्री वेगवेगळ्या व्यासपीठांवर मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र, निजामांचे गॅझेट, मराठ्यांचे आंदोलन, मराठा समाजासाठी असणारी सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या विरोधात बोलत आहेत. पण, ही बाब निश्चित चुकीची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मंत्री छगन भुजबळ हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबद्दल चुकीचा प्रचार करत आहेत. खरंतर महामंडळाने कोणालाच कोटीचे कर्ज दिलेले नाही. तर, १३ कोटींचा व्याज परतावा दिला असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

आम्ही १९८० सालापासून लढतोय. आता कुठे वर्ष २०१७-१८ नंतर मराठा समाजाला न्याय मिळाला आहे. मात्र, मराठा समाजातील उद्योजक उभे राहताहेत हे पाहून भुजबळांच्या पोटात दुखतंय आणि याची माहिती त्यांच्या पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांना असणारच, अशी टीकाही नरेंद्र पाटील यांनी केली.