मुंबईच्या वीरमाता जिजाबाई तंत्रशिक्षण संस्थेत एम. टेक.ला शिकणाऱ्या धीरज जाधवच्या ‘एक्स-बॅण्ड’ तंत्रज्ञानाची चर्चा सर्वत्र होत असून अंतराळाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ‘नासा’ने मंगळावरील जीवसृष्टीचा वेध घेण्यासाठी धीरजच्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे. धीरज आणि त्याच्या सहकाऱ्यांनी विकसित केलेल्या एक्स-ब्रॅण्ड तंत्रज्ञानामुळे तो सर्वाच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. नॅशनल एरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) एका चमूतर्फे ‘क्युरोसिटी’ या अवकाश यानासाठी डाटा ट्रान्समिशन सर्किट विकसित करायचे होते. त्यासाठी जगभरातील १० वैज्ञानिकांमध्ये उदयोन्मुख संशोधक म्हणून धीरजही सामील झाला होता. ‘एक्स बॅ्रण्ड’ तंत्रज्ञान विकसित करण्यात त्याने मोलाचे योगदान दिले आहे.

काय आहे तंत्रज्ञान?
‘नासा’ने २६ नोव्हेंबरला २०११ला एक अवकाशयान मंगळावर पाठवले. ते गेल्या वर्षी ६ ऑगस्टला मंगळावर पोहोचले. मंगळावर जीवसृष्टी होती का, ती आहे का किंवा भविष्यात जीवसृष्टीनिर्मितीची शक्यता आहे का? या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधार्थ ही मोहीम आहे. त्यात मंगळावरून संदेश पाठवण्याचे तंत्रज्ञान म्हणजे ‘डीप सॅटेलाइट नेटवर्क.’ त्यासाठी जगभरातून दहा संशोधकांचा चमू तैनात करण्यात आला होता. त्यामध्ये ‘एक्स- बॅण्ड टेक्नॉलॉजी’वर धीरज व त्याच्या सहकाऱ्यांनी काम केले. मंगळावरील यानापर्यंत सिग्नल पाठवायचा आणि तो कमी वेळेत स्वीकारणे हे महत्त्वपूर्ण काम एक्स बॅण्ड तंत्रज्ञान करते. या एवढय़ाच कामासाठी यापूर्वी ३० ते ६० मिनिटे लागायची. एस-बॅण्ड तंत्रज्ञानामुळे हा कालावधी ४३ सेकंदांपर्यंत आला. त्यामुळे सिग्नल पाठवणे किंवा स्वीकारणे या कामासाठी २४ तास लागायचे ते काम आता एका तासात होऊ शकते, असे धीरज म्हणाला.

काय आहे धीरजची यशोगाथा?
धीरज मूळचा यवतमाळचा असून त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण यवतमाळमध्ये झाले. दहावीनंतर सीईटी दिली. त्यात तो चौथ्या क्रमांकावर होता. त्याचे उच्च माध्यमिक शिक्षण पुण्याच्या फग्र्युसन महाविद्यालयात झाले. अवकाशातील गूढ विश्वाविषयी सुरुवातीपासूनच त्याला आकर्षण होते. पुण्यात गेल्यानंतर त्याला त्याविषयी आणखी जाणून घेण्याची संधी धीरजला मिळाली आणि त्यानंतर बी. टेक्.साठी व्हीजेटीआयमध्ये प्रवेश घेऊन एम. टेक्.मध्ये तर ‘नासा’पर्यंत धीरजने मजल मारली. धीरजने यशाचे श्रेय आई-वडील आणि अभियंता बंधू अनुप जाधव यांना दिले आहे. वडील अमरावतीमध्ये मोटर परिवहन अधीक्षक आहेत तर आई आशा जाधव गृहिणी आहेत. स्वत:च्या कामगिरीविषयी बोलताना धीरज म्हणाला, वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारे अनेक सक्षम भारतीय विद्यार्थी आहेत. त्यांना संधी मिळायला हवी. तसेच विद्यार्थ्यांनी केवळ परिस्थितीचा बाऊ न करता संधीचा लाभही घ्यायला हवा.  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक्स-बॅण्ड तंत्रज्ञानामुळे अवकाशातील संशोधनात भर पडली आहे. त्यामुळे मंगळ ते पृथ्वी दरम्यान संवाद करणे सोपे झाले आहे. मंगळावर उतरलेले ते यान पुढील दोन वर्षे २०० ट्रान्समिशन करणार आहे.     -धीरज जाधव