scorecardresearch

“औरंगजेबाच्या कबरीवर फुले अर्पण करणाऱ्यांचे दात तोडून दाखवा, तेव्हाच तुमच्यात…”; राणांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

उद्धव ठाकरेंच्या नावाने आलेले महाराष्ट्रावरचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी हनुमान मंदिरात आरती करणार आहोत, असेही नवनीत राणा म्हणाल्या

Navneet Rana challenges Chief Minister Uddhav Thackeray

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण यांनी कार्यकर्त्यांसह खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरुन आता दिल्लीत असलेल्या खासदार नवनीत राणा यांनी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. हनुमान चालिसा म्हणणे राजद्रोह आहे तर औरंगजेबाच्या कबरीवर फुले अर्पण करण्याला काय म्हणाल, असा सवाल नवनीत राणा यांनी केला आहे.

“उद्धव ठाकरेंच्या नावाने आलेले महाराष्ट्रावरचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी हनुमान मंदिरात आरती करणार आहोत. त्यांनी मला वज्र द्या मी दात तोडण्याचे काम करेन असे सांगितले आहे. माझ्या महाराष्ट्राच्या जनतेचे दात तोडण्याची गरज नाही. जर दात तोडायचे असेल तर औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले अर्पण करणाऱ्यांचे तोडून दाखवा. तेव्हाच तुमच्यात हिंदुत्व जिवंत आहे, यावर आमचा विश्वास बसेल,” असे नवनीत राणा म्हणाल्या.

“आज संभाजी महाराजांची जयंती आहे. त्याचवेळी त्यांच्याविरोधात हार अर्पण केले जात असतील तर हिंदुत्ववादी मुख्यमंत्री कुठे गेले हा माझा प्रश्न आहे. हनुमान चालिसा म्हणणे राजद्रोह आहे तर कबरीवर फुले अर्पण करण्याला काय म्हणाल,” असा सवाल नवनीत राणा यांनी केला आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एमआयएम नेत्यांना हे तुम्ही दिलेलं आव्हान असून आपण स्वीकारलं असल्याचं म्हटलं आहे. तसंच औरंगजेबाला याच मातीत गाडलं होतं हे विसरु नका असा इशारा दिला आहे. “औरंगजेबाला आम्ही याच मातीत गाडलं होतं आणि औरंगजेबाचे जे भक्त आहेत जे राजकारण करु इच्छित आहेत त्यांचीही हीच स्थिती होईल. महाराष्ट्रातील माती मर्दांची, शुरांची आणि महाराजांची आहे,” असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

“संभाजीनगरला वारंवार यायचं आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे आम्हाला सर्वांना, महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकत महाराष्ट्रात अशांतता निर्माण कऱण्याचं ओवेसी बंधूंचं राजकारण दिसत आहे. पण मी इतकंच सांगेन की औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली आहे. त्याला कबरीत आम्ही टाकलं आहे. तुम्ही कबरीवर येऊन नमाज पठण करत आहात, कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल,” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Navneet rana challenges chief minister uddhav thackeray abn

ताज्या बातम्या