‘संपुआ’च्या नवनीत राणा विजयी

अमरावती लोकसभा मतदारसंघातील अत्यंत चुरशीच्या लढतीत संयुक्त पुरोगामी आघाडीचे समर्थन लाभलेल्या अपक्ष उमेदवार नवनीत कौर-राणा या निर्णायक विजय मिळवला आहे.  सोळाव्या फेरीअखेर नवनीत राणा यांना ४ लाख ८० हजार ५७१ तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी आनंदराव अडसूळ यांना ४ लाख ३९ हजार ४६१ मते प्राप्त झाली होती. संपूर्ण राज्यात भाजप-शिवसेना युतीला दमदार यश मिळत असताना अमरावतीतून नवनीत राणा यांनी मारलेली झेप लक्षवेधी ठरली आहे.

मतमोजणीच्या सहाव्या फेरीअखेर आनंदराव अडसूळ हे ३ हजार ६०६ मतांनी आघाडीवर होते. सातव्या फेरीत कल अकस्मात बदलला आणि अडसूळ हे तब्बल ११ हजार ४४५ मतांनी पिछाडीवर गेले. नंतर राणा यांचे मताधिक्य वाढतच गेले. सहाव्या फेरीत अमरावती विधानसभा मतदारसंघातून आनंदराव अडसूळ यांच्या खात्यात अवघी ५२ मतांची नोंद झाली, तर त्याचवेळी नवनीत राणा यांचे पारडे तब्बल १० हजार ७९९ मतांनी वजनदार झाले. सातव्या फेरीतही असाच प्रकार दिसून आला. तीत अडसूळ यांच्या वाटय़ाला अमरावती विधानसभा मतदारसंघातून केवळ ४७ मते आली, तर नवनीत राणा यांना ९ हजार ३६४ मतांचे पाठबळ मिळाले. या दोन फेऱ्यांनी मोठा फरक घडवून आणला.

अपेक्षेप्रमाणे अमरावतीत अडसूळ आणि नवनीत राणा यांच्यात थेट लढत पहायला मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे यांना तिसऱ्या क्रमांकाची ५९ हजार ६२३ मते मिळाली आहेत. बसपचे अरुण वानखडे हे चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना अवघी ११ हजार ४३६ मते प्राप्त झाली.

पहिल्या फेरीत आनंदराव अडसूळ यांनी २८ हजार ३३५ मते घेत नवनीत राणा यांच्यावर ४ हजार ३४८ मतांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीतही अडसूळ यांचे मताधिक्य कायम राहिले. पाचव्या फेरीत ९ हजार ३३० मतांची आघाडी मिळाल्याने शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला, पण त्यांचा आनंद अल्पकाळ टिकला. सहाव्या फेरीपासून नवनीत राणा यांचे मताधिक्य वाढत गेल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रावर बांधाबांध करण्यास सुरुवात केली. दहाव्या फेरीनंतर शिवसेनेच्या तंबूत अस्वस्थता पसरली. अकराव्या फेरीत नवनीत राणा यांचे मताधिक्य ३५ हजार ७०१ वर पोहचले आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या आशा मावळल्या.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळा आणि अमरावती लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या आनंदराव अडसूळ यांच्या समर्थकांसाठी ही पिछाडी धक्कादायक ठरली आहे. अडसूळ यांनी २००३ ते २००४ या काळात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. गेल्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी अडसूळ यांना चांगलीच टक्कर दिली होती. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता.