scorecardresearch

नवाब मलिकांना ईडीकडून अटक, कारण ठरला डॉन दाऊद इब्राहिम; काय आहे प्रकरण? जाणून घ्या…

ईडीने दाऊद इब्राहिमसोबतच्या संबंधामुळे नवाब मलिकांना अटक केली असून त्यांची त्या आधी ८ तास चौकशी करण्यात आली होती.

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अंडरवर्ल्डशी असलेल्या कथित संबंधांबद्दल सुमारे आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. नवाब मलिक यांची कुर्ल्यातील जमिनीच्या संदर्भात चौकशी केली जात आहे, जी त्यांनी अनेक वर्षांपूर्वी कवडीमोल दरात विकत घेतली होती, असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्यावर केला. काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या…

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलसह डी-कंपनीच्या सात जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. हे लोक भारतात होत असलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा दावा तपास संस्थेने केला आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद, जमात-उद-दावा आणि अल कायदा यांसारख्या दहशतवादी संघटनांशी त्यांचे संबंध आहेत.अतिमहत्त्वाच्या व्यक्तींवर हल्ला करण्याचा कट आखला जात असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसाही गुंतवला असल्याचा संशय होता. त्यानंतर ईडीने दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर ईडीने मुंबईत छापादेखील मारला होता. ईडीने दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक केली. तो सध्या ईडी कोठडीत आहे.

हेही वाचा – Nawab Malik ED Inquiry live : दाऊद इब्राहिम कनेक्शन ; आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ‘ईडी’कडून अटक

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरविरोधात २०१७ मध्ये ठाणे पोलिसात पैसे उकळल्याचा गुन्हा दाखल झाला होता. ठाणे पोलिसांनी त्यावेळी त्याला बेड्याही ठोकल्या होत्या. तेव्हापासून इक्बाल कासकर तुरुंगात आहे. ईडीने कोर्टात सांगितले की, इक्बाल कासरकर डी गँगचा सदस्य आहे. तो लोकांना धमकावून वसूली करतो. भारतातील सेलेब्रिटींना धमकावून इक्बाल पैशांची वसूली करतो. दाऊदच्या नावाखाली तो लोकांना कोट्यवधी रुपयांना लुबाडत असल्याचेही सांगण्यात आले. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी मुंबईत छापेमारी केली होती. यामध्ये दाऊदचे नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींचा समावेश होता. दाऊद आणि त्याच्याशी संबंधित मालमत्ता खरेदी करणारे, व्यवहार करणारे राजकारणी आणि इतर महत्त्वाच्या व्यक्ती ईडीच्या रडारवर आले होते.

या कागदपत्रांच्या आधारे एनआयएने (NIA) नुकताच गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. ईडी छोटा शकीलचा मेहुणा सलीम याची चौकशी करत आहे. बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने सलीम अनेक वेळा पाकिस्तानात गेल्याचा संशय एजन्सींना आहे. तो दाऊद आणि शकीलच्या सांगण्यावरून मुंबईत काम करतो, असा ईडीचा विश्वास आहे. ईडी त्याच्या बँक खाते आणि संपत्तीची माहिती गोळा करत आहे. ईडीला संशय आहे की हे लोक खंडणी, सेटलमेंट आणि ड्रग्सद्वारे पैसे जमा करतात आणि त्याचा वापर दहशतवादी कारवाया किंवा हवालाद्वारे देशविरोधी कारवायांसाठी करतात. ईडी त्यांच्या मनी ट्रेलचा शोध घेत आहे.

दरम्यान, दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने आतापर्यंत 6 जणांचे जबाब नोंदवले आहेत. याच प्रकरणी ईडीने 2 बिल्डरांना समन्स पाठवले असून, त्यांचे जबाबही नोंदवले जाणार आहेया संपूर्ण मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपींनी डिजिटल वॉलेट आणि डार्कनेटचा वापर करून पैसे इकडे तिकडे ट्रान्सफर केले आहेत. या संपूर्ण प्रणालीचा वापर २०१९ च्या सुमारास सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. खंडणी, ड्रग्ज, रिअल इस्टेट आणि सट्टेबाजीमध्ये अंडरवर्ल्ड अजूनही भारतात सक्रिय असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nawab malik dawood ibrahim relations case ed arrested malik vsk

ताज्या बातम्या