एटापल्ली पंचायत समितीच्या सभापती लता मट्टामी यांचे पती घिसू मट्टामी यांची आज सायंकाळी नक्षलवाद्यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानात शिरून हत्या केली.
सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास काही नक्षलवादी सभापती लता मट्टामी यांच्या निवासस्थानी आले. दरवाजा ठोठावल्यावर त्यांचे पती घिसू मट्टामी यांनी दार उघडताच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली व ते पसार झाले. सभापती लता मट्टामी यांचे शासकीय निवासस्थान एटापल्लीच्या अगदी मुख्य रस्त्यावर असून तेथे वर्दळही असते. गेल्या रविवारी भामरागड तालुक्यातील राजाराम खानला येथे काँग्रेस नेते तलांडी यांची अशीच निर्घृण हत्या करण्यात आली होती.  
२०११ मध्ये गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी असेच हत्यासत्र सुरू केले होते. भामरागड येथे पंचायत समितीचे सभापती बहादूरशहा आलम यांची हत्या केली होती. एटापल्लीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अटकमवार यांची हत्या केली होती. या दोघांसह अनेक सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना नक्षलवाद्यांनी ठार केले होते आणि अनेक लोकप्रतिनिधींचे अपहरण केले होते. पुन्हा नक्षलवाद्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर हत्यासत्र सुरू केले आहे.
नक्षलवाद्यांच्या शीघ्र पथकाचे हे कृत्य आहे, असे गडचिरोलीचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.