पालकमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाच आणि जिल्हा व पोलीस प्रशासन सिरोंचा येथे पुषकर कुंभ मेळाव्यात व्यग्र असताना नक्षलवाद्यांनी दोन निरपराध आदिवासी युवकांची हत्या केलीय. हे युवक पोलीस खबरी असल्याच्या संशयातून ही हत्या झाली. बुधवार १३ एप्रिलला रात्री पोलीस मदत केंद्र गट्टा (जां) हद्दीमध्ये ही घटना घडली. मंगेश मासा हिचामी (२७, रा. झारेवाडा, पो. गट्टा) आणि नविन पेका नरोटे (२५, रा. गोरगुट्टा पो. गट्टा) अशी या आदिवासी युवकांची नावं आहेत.

नक्षलवाद्यांनी या तरुणांची पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन निर्घृण हत्या केली. नक्षलवादी १३ एप्रिल रोजी रात्री १० वाजता मंगेश हिचामी याला घरातून बळजबरीने घेऊन गेले. दुसरीकडे नविन नरोटे यालाही त्याच दिवशी रात्री १ वाजता घरातून बळजबरीने घेऊन गेले आणि दोघांचीही हत्या केली. या दोघांच्याही हत्येनंतर युवकांचे मृतदेह रस्त्यावर आणून टाकण्यात आले.

हेही वाचा : “मिलिंद तेलतुंबडे कायम ३ स्तरीय सुरक्षेत फिरायचा, असं असतानाही…”, नक्षलवाद्यांवरील कारवाईवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

मंगेश हिचामी याचा मृतदेह झारेवाडा ते गट्टा रोडवर, तर नविन नरोटे याचा मृतदेह गोरगुट्टा ते गिलनगुडा रोडवर सापडला. या घटनेमुळे नक्सली हिंसाचार पुन्हा एकदा दहशत व भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे दिसत आहे.