गेल्या दहा वर्षांपासून गडचिरोली व गोंदिया जिल्हय़ांत झालेल्या हिंसक कारवायांमध्ये सक्रिय असलेला जहाल नक्षलवादी पहाडसिंग आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत आहे. गेल्या आठवडय़ात शेजारच्या छत्तीसगडमध्ये शरण आलेल्या काही नक्षलवाद्यांच्या जबाबातून ही माहिती समोर आली आहे.
सध्या उत्तर गडचिरोली व गोंदिया विभागाचा कमांडर असलेला पहाडसिंग कुख्यात नक्षलवादी म्हणून ओळखला जातो. त्याच्या नावावर ६० पेक्षा जास्त गुन्हय़ांची नोंद आहे. २००३ मध्ये चळवळीत दाखल झालेल्या पहाडसिंगने गेल्या १० वर्षांत अनेकांना ठार केले. पोलिसांसोबत झालेल्या अनेक चकमकीत तो अग्रस्थानी राहिला आहे. त्याच्या चळवळीत जाण्याची कथा सुद्धा विलक्षण आहे. मूळचा राजनांदगाव जिल्हय़ातील फाफामार या गावचा असलेल्या पहाडसिंगची पत्नी शकुनीबाई २००१ ते २००३ या काळात गावची सरपंच होती. गावात विकास कामे करण्यावरून या पती पत्नीचा गावकऱ्यांशी वाद झाला. त्यातून शकुनीबाईवर अविश्वास आणण्यात आला. यामुळे अस्वस्थ झालेल्या पहाडसिंगने थेट बंदूक हाती धरली. गेल्या वर्षी गडचिरोली पोलिसांनी पहाडसिंगच्या घरी जाऊन त्याच्या मुलीला वैद्यकीय शिक्षण देण्याची तयारी दर्शवली होती.
या बातमीमुळे सुरुवातीला अस्वस्थ झालेला पहाडसिंग नंतर वरमला व त्याने मुलीने शिक्षण घ्यावे असे पत्रक जारी केले. राजनांदगाव पोलिसांसमोर गेल्या आठवडय़ात पहाडसिंगचा अंगरक्षक म्हणून काम करणारा संदीप नावाचा नक्षलवादी शरण आला. त्याने दिलेल्या जबाबातून पहाडसिंग आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. संदीपला शरण जाण्यासाठी पहाडसिंगनेच भाग पाडले. चळवळीत लग्न झालेल्या संदीपला मूल हवे होते. चळवळीच्या नियमानुसार ते शक्य नव्हते. त्यामुळे पहाडसिंगने त्याला शरण जाण्याचा सल्ला दिला. आता चळवळीतील माझी उपयोगिता संपलेली आहे. चळवळीतले इतर सहकारी सुद्धा संशयाने बघतात. कुणीही बोलायला तयार नाही. वय झाल्यामुळे आता जलद हालचाली सुद्धा होत नाहीत. त्यामुळे आता लवकरच शरण येणार असे पहाडसिंगने सांगितल्याचा दावा संदीपने आपल्या जबाबात केला आहे.
चळवळीतील सहकाऱ्यांचा विश्वास गमावला असल्याने आता पुन्हा यात सक्रिय राहण्यात अर्थ नाही अशी भावना पहाडसिंगने बोलून दाखवल्याची माहिती संदीपने दिली आहे.
गेली ४ वर्षे संदीप हा पहाडसिंगचा अंगरक्षक होता. त्यामुळे त्याने दिलेली माहिती खरी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घडामोडीनंतर पहाडसिंगने छत्तीसगडऐवजी महाराष्ट्रात आत्मसमर्पण करावे यासाठी पोलिसांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पहाडसिंग शरण आला तर उत्तर गडचिरोली व गोंदिया जिल्हय़ातील चळवळीला मोठे खिंडार पडेल, असा दावा आज एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने लोकसत्ता’शी बोलताना केला.