लाल चीनने दिलेल्या पाठिंब्यावर देशभर हिंसक कारवाया करणाऱ्या नक्षलवाद्यांना आता चीन भांडवलदारधार्जिणा आणि शोषक देश असल्याचा साक्षात्कार झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत चीनविरोधी सूर आळवण्यात आला. नक्षलवाद्यांच्या या भूमिकेमुळे या चळवळीवर बारीक नजर ठेवून असलेल्या गुप्तचर यंत्रणाही चक्रावल्या आहेत.
माओवादाची कर्मभूमी असलेल्या चीनकडे पाहूनच आतापर्यंत नक्षलवाद्यांनी आपली चळवळ चालवली आहे. याच माओतत्त्वावर देशात लाल क्रांती घडवून आणण्याची भाषा करणाऱ्या नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीची बैठक गेल्या वर्षांच्या अखेरीस गुप्त ठिकाणी पार पडली. या बैठकीत तयार करण्यात आलेल्या दस्तऐवजात चीनवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. ‘विद्यमान राजकीय परिस्थिती’ या नावाने असलेला हा दस्तऐवज ‘लोकसत्ता’ला उपलब्ध झाला आहे. चीन हा जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता म्हणून उदयाला आला असला तरी तेथील राजवटीने माओवादाला तिलांजली देत भांडवलदारधार्जिण्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार केला असल्याचे नक्षलवाद्यांचे म्हणणे आहे. इतर लहान देशांचे शोषण करण्यातही ही राजवट तरबेज असल्याची टीका या दस्तऐवजात आहे. याच दस्तऐवजात नक्षलवाद्यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही आढावा घेतला असून अमेरिकेवर जबर टीका केली आहे. देशातील स्थितीचा आढावा घेताना येथील राजकीय पक्षांना अनेक दूषणे दिली आहेत.
दलाई लामा दलाल
नक्षलवाद्यांनी याच दस्तऐवजात तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांना अमेरिकेचे दलाल असल्याचे म्हटले आहे. अमेरिका त्यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक तिबेटचा प्रश्न चिघळत ठेवत असल्याचे नक्षलवाद्यांचे म्हणणे आहे.

दस्तऐवजातील टीकेचा सूर
* चीनमधील कम्युनिस्ट नेत्यांमध्ये भ्रष्टाचार करणारा एक वर्ग तयार झाला आहे
* या वर्गाला देशातील, तसेच जगातील गरिबांविषयी कळवळा उरलेला नाही
* उद्योगपतींसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत
* जनतेवर दडपशाही चालवली असून चीनची वाटचाल ‘फॅसिस्ट राज्या’कडे
* ब्रह्मदेश, श्रीलंका व भूतानमधील सरकारांना मदत करून चीनने तेथील जनवादी आंदोलने दडपली