राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे गटातील आमदारांच्या बंडखोरीवरून सातत्याने विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. यामध्ये विधानभवनात दिलेल्या “५० खोके, एकदम ओके” या घोषणेची तर महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाला खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीवरून टोलेबाजी केली. तसेच, राज्य सरकार कुणाच्या दबावाखाली काम करतंय का? असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

“केंद्रीय मंत्री बारामतीत येऊन…”, भाजपाच्या ‘मिशन बारामती’वर शरद पवारांचा खोचक टोला!

“शिंदे सरकार कुणाच्या दबावाखाली झुकतंय का? शिंदे सरकारमध्ये दबाव झुगारण्याची ताकद नाहीये का? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलंय की कारण नसताना कुणाच्यासमोर झुकायचं नाही. पण इथे तर झुकायला सुरुवात झाली. अजून तर अडीच महिनेही नाही झाले”, असं अजित पवार म्हणाले.

“यांना मिरच्या झोंबल्या”

५० खोके, एकदम ओके या विरोधकांच्या घोषणेच्या मिरच्या सत्ताधाऱ्यांना झोंबल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले. “५० खोके, एकदम ओके या घोषणा त्यांना झोंबल्या. खरंच..खोटं नाही सांगत. रात्री बावचळून उठतात. खोकं खोकं खोकं.. ओकं ओकं ओकं! आरे कशाचं खोकं आणि कशाचं खोकं?” असा टोला अजित पवारांनी यावेळी लगावला.

दरम्यान, वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी आज सकाळी राज्य सरकारवर टीकास्र सोडलं होतं.”उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वेदान्त प्रकल्प राज्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले. वेदान्तने कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्राला निवडलं होते. मात्र, आता गुजरातचे नाव समोर येत आहे. महाराष्ट्रात येणारा प्रकल्प दुर्लक्षामुळे बाहेर जात असेल, तर कदापी खपवून घेतलं जाणार नाही”, असा इशारा अजित पवारांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय गायकवाड यांना टोला

यावेळी बोलताना अजित पवारांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनाही टोला लगावला आहे. संजय गायकवाड यांनी “चुन चुन के मारेंगे” असं विरोधकांना उद्देशून म्हटल्यानंतर त्यावरून अजित पवारांनी खोचक टोला लगावला आहे. “बुलढाण्याचे एक आमदार म्हणाले की एकनाथ शिंदेंविरोधात बोलाल तर चुन चुन के, गिन गिन के मारेंगा.. अरे तुला काय घरच्या किड्या-मुंग्यांसारखे वाटलो का? चुन चुन के, गिन गिन के मारेंगे”, असं अजित पवार म्हणाले.