नाट्यमय घडामोडींनंतर अंधेरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीतून भाजपाने अखेर माघार घेतली. यामुळे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपाने राज्याची राजकीय परंपरा कायम ठेवत माघार घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून टीका-टिप्पणी होत आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना चांगल्या निर्णयाला चांगलं म्हटलं पाहिजे असा सल्ला दिला आहे.

काय म्हणाले अजित पवार?

“काल एक चांगला निर्णय झाला. रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरीमधील पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली होती. शरद पवार यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केलं होतं. तसंच राज ठाकरेंनी पत्र लिहिलं होतं. भाजपाने त्यासंबंधी सकारात्म भूमिका घेतली याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. कारण महाराष्ट्रात जर असे पायंडे पडले तर ते चांगलं आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “इतका आडमुठेपणा…”

पुढे ते म्हणाले की “गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सामंजस्याची भूमिका घेतली होती. संपूर्ण महाराष्ट्राने ते पाहिलं होतं. यानिमित्ताने दिवाळीच्या तोंडावर चांगलं वातावरण निर्माण झालं आहे”.

“चांगल्याला चांगलं म्हणा”

“पण यावर काहीजण टीका करत आहेत. आता चांगलं झाल्यावर कशाला टीका करायची. शब्दाने शब्द वाढत जातो. चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे असं माझं सर्वच राजकीय पक्षांना आवाहन आहे. वेगळा अर्थ काढून उगाच कोणाला तरी डिवचण्याचा, उचकवण्याचा प्रयत्न करु नये हे माझं स्पष्ट मत आहे,” असंही अजित पवारांनी सांगितलं.

अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी, सोमवारी भाजपचे मुरजी पटेल यांनी माघार घेतली. या पोटनिवडणुकीत १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीनंतर लटके यांच्यासह सात उमेदवार रिंगणात असल्याने ३ नोव्हेंबरला प्रत्यक्ष मतदान होईल.

मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार, ऋतुजा लटकेंचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवंगत लोकप्रतिनिधीच्या कुटुंबियांतील कोणी लढत असल्यास पोटनिवडणूक बिनविरोध करून राज्यातील उज्ज्वल परंपरेचे पालन करावे, असे आवाहन मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले होते. तसेच ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केली होती. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली होती. राज ठाकरे यांच्या सूचनेबाबत गांभीर्याने विचार करण्यात येईल, असे नमूद करत पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.