गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याबद्दल एकमेकांना जबाबदार ठरवलं जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या चुकीमुळे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची टीका विरोधकांनी केली आहे, तर यासाठी महाविकास आघाडीचं सरकार जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांच्या आरोपांविषयी विचारणा होताच त्यावरून सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेतलं आहे. “हे धादांत खोटं आहे. आता तीन महिने झाले यांना मुख्यमंत्री होऊन. कंपनीचं ते ट्वीट आल्यानंतर हे सगळं समजलं. आज ९० दिवस काही कमी नाहीयेय. स्वत: प्रयत्न करायचे नाहीत. कित्येक दिवस तर ते दोघंच मंत्रीमंडळात होते. त्यावेळी मोठे प्रकल्प वगैरे याबात प्रयत्न करायला हवे होते”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

“ते तर म्हणत होते की आम्ही दोघं..”

यावेळी अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर खोचक शब्दांत टीका केली. “ते तर म्हणत होते की आम्ही दोघं खंबीर आहोत. अजूनही पालकमंत्री नेमलेले नाहीत. ते काय सांगतायत? तीन तीन महिने तुम्हाला पालकमंत्री नेमता येत नाहीत. इतकी कामं, इतक्या कमिट्या असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात. खूप गोष्टी असतात. त्यावर काही करत नाहीत आणि आम्ही काही बोललो की हे असंच बोलतात वगैरे सांगतात. आम्ही वस्तुस्थितीला धरून बोलतो. यावरून लक्ष बाजूला जाण्यासाठी तिसरंच काहीतरी काढतात”, असा आक्षेप अजित पवारांनी यावेळी नोंदवला.

“..आता महाराष्ट्रातील भाजपावाल्यांचं यावर काय म्हणणं आहे?” केंद्रीय समितीच्या ‘त्या’ अहवालावरून शिवसेनेचा सवाल!

“प्रकल्प आणा, आम्ही सहकार्य करू”

दरम्यान, राज्याच्या हिताचे प्रकल्प आणल्यास आम्ही सरकारला सहकार्य करू, असं अजित पवार यावेळी म्हणाले. “अजूनही त्यांनी हा प्रकल्प राज्यात आणावा, दुसरेही प्रकल्प आणावेत. राज्याच्या हिताचे, पर्यावरणाला धक्का न पोहोचवणारे प्रकल्प त्यांनी आणावेत. त्यासाठी आमची संमती आहे. विरोधी पक्षनेता या नात्याने मी सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहे”, असं अजित पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सत्ताधाऱ्यांना सुनावलं

यावेळी अजित पवारांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनाही सुनावलं. “आरोप-प्रत्यारोप करून महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार नाहीत. आम्हीही चुकीचे आरोप करण्यात अर्थ नाही. त्यांनीही काहीतरी थातुरमातुर उत्तर देऊन वेळ मारून नेण्यात अर्थ नाही. महाराष्ट्रात प्रकल्प आले पाहिजेत. हा प्रकल्पही इथे उभा राहिला पाहिजे. त्यासाठी त्यांना जी काही ताकद पणाला लावायची असेल, कुणाला भेटायचं असेल त्यांना भेटावं”, असं ते म्हणाले.