scorecardresearch

“माझं मत आहे की त्यानं…”, सत्यजीत तांबेंना अजित पवारांनी दिला ‘हा’ सल्ला; पुढील वाटचालीबाबत म्हणाले…!

अजित पवार म्हणतात, “त्या मतदारसंघात त्याला एवढी मतं मिळाल्यामुळे महाविकास आघाडीतील इतरंनीही त्याला मदत केलेली दिसते. त्याचे निवडणुकीचे आडाखे आणि मविआतल्या लोकांनी…!”

ajit pawar satyajeet tambe
अजित पवारांचा सत्यजी तांबेंना पुढील वाटचालीसाठी सल्ला! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव करून अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे विजयी झाले आहेत. काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. यानंतर त्यांना अनेक पदवीधर आणि शिक्षक संघटनांचा पाठिंबाही मिळाला होता. यानंतर गुरुवारी लागलेल्या निकालांमध्ये सत्यजीत तांबेंनी मोठा विजय मिळवल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता त्यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल? याविषयी तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. एकीकडे भाजपानं त्यांना पक्षासोबत येण्याची ऑफर दिलेली असतानाच काँग्रेसकडूनही दरवाजे बंद करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सत्यजीत तांबे यांच्या राजकीय वाटचालीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

४ फेब्रुवारीला स्पष्ट करणार भूमिका

शुभांगी पाटील यांचा पराभव केल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना सत्यजीत तांबे यांनी येत्या ४ फेब्रुवारी रोजी अर्थात शनिवारी पुढील वाटचालीबाबत भूमिका मांडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. अनेक राजकीय मुद्द्यांवर यावेळी आपण सविस्तर बोलू, असंही ते म्हणाले. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेस यांच्यापैकी कोणता पर्याय सत्यजीत तांबे निवडणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. विशेष म्हणजे त्यांचे वडील सुधीर तांबे यांनी सत्यजीत तांबेंना अपक्ष राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सत्यजीत तांबेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

अमरावती पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी, भाजपाला धक्‍का

नाना पटोलेंचं सूचक विधान

दरम्यान, सत्यजीत तांबेंबाबत पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचक विधान केल्यामुळे यावरून चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, अशा आशयाचं विधान नाना पटोलेंनी केलं आहे. तर राधाकृष्ण विखे पाटलांनी सत्यजीत तांबे भाजपासोबत आले तर आनंदच आहे, असं विधान केलं आहे. यावरून राजकीय चर्चा चालू असताना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्यजीत तांबेंना राजकीय सल्ला दिला आहे.

MLC Election : “झाशीची राणी लढली तसं मला लढायचं होतं…” निवडणुकीतील पराभवानंतर शुभांगी पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

अजित पवारांचा सल्ला

“इतके दिवस चेंडू काँग्रेसच्या कोर्टात होता. सत्यजीत निवडून आल्यानंतर काँग्रेस, भाजपा त्यांच्या त्यांच्या पक्षाकडे त्याला बोलवायचा प्रयत्न करणार. सत्यजीतला पुढे त्याचं राजकीय भवितव्य आहे. त्याला बरीच वर्षं राज्याच्या राजकारणात काम करायचंय. या सगळ्याचा विचार करून त्यानं निर्णय घ्यावा”, असं अजित पवार म्हणाले.

निवडणूक जिंकली, आता पुढे काय? सत्यजीत तांबेंनी केले सूतोवाच; म्हणाले, “येत्या ४ तारखेला…!”

“मविआतल्याही काहींनी सत्यजीतला मदत केली”

“त्याचं घराणं काँग्रेसच्या विचारधारेशी निगडित असल्यामुळे मधल्या दीड महिन्यात काय झालं हे त्यानं जास्त मनाला लावून घेऊ नये. त्यानं काँग्रोसच्या बरोबर जावं, बाळासाहेब थोरात, सुधीर तांबे हे घरातले मोठे नेते आहेत. ते सांगतील ते त्यानं ऐकावं. याउपर काय करायचं हा सर्वस्वी त्याचा अधिकार आहे. त्या मतदारसंघात त्याला एवढी मतं मिळाल्यामुळे महाविकास आघाडीतील इतरांनीही त्याला मदत केलेली दिसते. त्याचे निवडणुकीचे आडाखे आणि मविआतल्या लोकांनी, मतदारांनी त्याला दिलेली साथ यामुळेच एवढं दैदिप्यमान यश मिळालं आहे”, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

Live Updates

First published on: 03-02-2023 at 12:35 IST