लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज शरद पवार यांचं बारामतीतल्या निंबूत गावात स्वागत करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून त्यांचं स्वागत केलं. तसंच तुतारीही वाजवण्यात आली. शरद पवारांना औक्षण करण्यात आलं. यावेळी शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक निकालाबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल वेगळा लागणार याची मला खात्री होती असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवारांचा सामना

बारामती लोकसभा मतदार संघात नणंद विरुद्ध भावजय म्हणजेच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना दिसला. यात सुनेत्रा पवार यांचा विजय होईल अशा चर्चा होत्या. कारण अजित पवारांनीही ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. काका शरद पवार यांच्याविरोधात त्यांनी दंड थोपटल्यापासूनची ही पहिलीच निवडणूक होती. मात्र शरद पवारांनी ज्या सभा घेतल्या त्याचा परिणाम निकालावर झाल्याचं पाहण्यास मिळालं. बारामतीत सुप्रिया सुळेंचा विजय झाला. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात १० जागा लढवल्या होत्या ज्यापैकी आठ जागा पक्षाने जिंकल्या आहेत. याचा उल्लेख करत शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत महत्त्वाचं विधान केलं.

हे पण वाचा- अजित पवार गटातील आमदारांची ‘घरवापसी’; शरद पवार गटाचे रोहित पवार यांचा दावा

काय म्हणाले शरद पवार?

महाराष्ट्राच्या जनतेने १० पैकी आठ ठिकाणी आपले उमेदवार निवडून दिले. तसंच या निवडणुकीने देशात एक संदेश पाठवला आहे की महाराष्ट्राचं वातावरण बदलतं आहे. महाराष्ट्रातली सत्ता भाजपा आणि त्यांच्या मित्रांकडे आहे. पण मला खात्री होती की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेल्यानंतर लोकांशी मी संवाद साधला. त्यामुळे निकाल वेगळा लागणार आहे हे मला स्पष्ट दिसत होतं. ४८ जागा या ठिकाणी लोकसभेच्या आहेत. त्यापैकी ३१ ठिकाणी भाजपाचा पराभव झाला आहे. आम्हाला हे ठाऊक आहे की अनेक अडचणी आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. साखर कारखान्यांचे प्रश्न आहेत. म्हणावा तसा पाऊस अद्याप पडलेला नाही. लोकांचं दुःख कमी करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो. आमचा प्रयत्न त्याच दृष्टीने असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकारणात काही गोष्टी कमी जास्त होत असतात

मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी फिरलो आहे. पण या गावात आलो नव्हतो. आज या गावात आलो आहे.आज मी सांगू इच्छितो की राजकारणात काही कमी जास्त होत असतं पण सगळ्या गोष्टी सोडून पुन्हा एकदा जोमाने कामाला लागायचं असतं. लोकांचं कल्याण ज्या गोष्टीमध्ये आहे ते केलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी जे स्वागत केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.