आहे भविष्य माझ्या हाती… मी प्रचंड आशावादी… राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने तयार केलेले हे प्रचारगीत. त्यातील शब्दरचनेनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसने गेल्या १५ वर्षांत केलेल्या कामांचा पाढा वाचत आणि भविष्यत कोणकोणत्या घटकांसाठी काय काय करणार, हे सांगत मंगळवारी कोल्हापूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीने प्रचाराचा शुभारंभ केला. अद्याप कॉंग्रेससोबत आघाडी झालेली नसली, तरी पक्षाच्या सर्वच नेत्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची तयारीही यावेळी दर्शविली.
कोल्हापूरातील गांधी मैदानावर झालेल्या जाहीर सभेला सातारा, सांगली या लगतच्या जिल्ह्यांसह राज्यातील इतर भागांतूनही कार्यकर्ते आले होते. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, गृहमंत्री आर. आर. पाटील, जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतर सर्व नेते सभेला उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवलेल्या भारतीय जनता पक्षावर तीव्र शब्दांत प्रहार करीत शरद पवार म्हणाले, अवघ्या तीन महिन्यांमध्ये केंद्रातील भाजपच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. पोटनिवडणुकीतील निकालांवरून ते दिसते आहे. संसदेमध्ये भगवी वस्त्रे घालून आलेले काही नेते मला दिसतात. धार्मिक तेढ वाढविण्याचे काम संसदेत निवडून गेलेले काही नेते करीत आहेत. साईबाबांना मानू नका, असे धर्मसंसद सांगते. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार चालविली जाणारी संसद आता या स्वरुपाच्या प्रवृत्तीकडून चालविली जाईल का, अशी भीती मला वाटू लागल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यास ६५ वर्षांवरील अल्पभूधारक शेतकऱयांना निवृत्तीवेतन सुरू करण्याची आणि सर्वांना अपघात विमा देण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. त्याचबरोबर देशात मोदी लाट असताना कोल्हापूरकरांनी पुरोगामी विचारांची कास न सोडता धनंजय महाडीक यांना निवडून दिले, त्याबद्दल शरद पवार यांनी कोल्हापूरकरांचे आभार मानले.
नितीन गडकरी यांनी पहिल्यांदा महाराष्ट्राचे व्हावे आणि मग त्यांनी राज्याची सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहावे, असा टोला आर. आर. पाटील यांनी लगावला. ते म्हणाले, भाजप हा साधूसंतांचा पक्ष नसून, तो संधिसाधूंचा पक्ष आहे. काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीवेळी असलेली नरेंद्र मोदी यांची लाट आता ओसरली आहे. केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांत घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजू शेट्टी यांनी आता ते शेतकऱयांच्या बाजूचे की सरकारच्या बाजूचे हे स्पष्ट करावे, असे विचारले. त्याचबरोबर राजू शेट्टी यांना शेतकऱयांचा कळवळा असेल, तर त्यांनी खासदारकीला लाथ मारावी, असाही टोला त्यांनी लगावला.
महाराष्ट्र तोडण्याचे स्वप्न पाहणाऱया भाजपला शिवसेना साथ देणार का, असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी विचारला. त्याचबरोबर आघाडी सरकारने घेतलेले निर्णय बदलण्याचे वक्तव्य करणाऱया देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. आघाडी सरकारचे निर्णय बदलण्याची ताकद कोणाच्या बापामध्ये नाही, असे भुजबळ म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp chief sharad pawar rally at kolhapur
First published on: 16-09-2014 at 09:17 IST