अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसने अब्दुल सत्तार यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. तसे निवेदन त्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे. राज्यपालांना निवदेन दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा – “सत्तारांना पदमुक्त करणं गरजेचं, मात्र, उपमुख्यमंत्री…”; सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या विधानावरून आदित्य ठाकरेंची पुन्हा टीका

काय म्हणाले जयंत पाटील?

“सुप्रिया सुळेंविरोधात अपशब्दांचा वापर करून अब्दुल सत्तार यांनी खालचा स्तर जाहीर केला आहे. राज्याच्या मंत्रीमंडळात असणाऱ्या एका जबाबदार मंत्र्याने अशी भाषा वापरणे तसेच भारताच्या संसदेच्या सदस्य असेलल्या महिलेचा अशा प्रकारे अपमान करणे, याचा निषेध आज संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात येत आहे. अशा मंत्र्याला मंत्रीमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी करणारे निवदेन आम्ही राज्यपालांना दिले आहे”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा – सुप्रिया सुळेंवरील अभद्र टिप्पणीनंतर किशोरी पेडणेकर आक्रमक, सत्तार यांंचा उल्लेख करत म्हणाल्या “दोन थोबाडीत…”

“ही पहिली घटना नाही. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना चहाऐवजी दारु पिता का? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. अनेकवेळा त्यांनी अशा प्रकारे विधानं केली आहेत. मंत्रीमंडळातील सदस्यांनी काही मर्यादा सांभाळाव्या लागतात. मात्र, त्याचे वारंवार उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी आम्ही राज्यापालांकडे केली आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “सुप्रिया तुला अधिक…” सत्तारांचा शिवीगाळ करतानाचा Video शेअर करत सदानंद सुळेंची पोस्ट; म्हणाले, “हे नव्या पुढारलेल्या सरकारचे…”

“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी ताबडतोब याबाबतीत निर्णय घेतला पाहिजे. राज्यात असा प्रकारे भाषा वापरण्याची पद्धत नाही. राज्याची एक राजकीय संस्कृती आहे. आपण कितीही एकमेकांचे विरोधक असलो, तरीही भाषेची मर्यादा नेहमीच सर्वांनी सांभाळली आहे. आपण कोणाचा अरे-तुरे असा एकेरी उल्लेखही करत नाही, अशा परंपरेला छेद देण्याचे काम सत्तार यांनी केले आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.

“राज्यपाल हे सर्वोच्च आहेत. सरकार ऐकत नसेल तर त्यांना आम्ही कैफियत मांडू शकतो. हा विषय माफी मागून संपणार नाही. हवे ते विधान करता मग माफी मागता हे महाराष्ट्रात चालणार नाही. सरकारमधील लोकांनी विचार करावा, त्यांना आपले सहकारी कसे हवेत. अब्दुल सत्तार यांच्यावर साधा गुन्हा दाखल केला जात नाही. मंत्री आहेत म्हणून पोलीस घाबरत असतील तर पोलिसांनी आपल्या कर्तव्यापासून चुकू नये, सरकारे येतात आणि सरकारे जात असतात”, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“या सरकारमधील मंत्र्यांची महिलांविषयी काय भूमिका आहे? महिलांचा द्वेष कशापद्धतीने करतात? यांचा महिलाविषयी काय विचार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. सरकारमधील मंत्री कसे असावेत याचा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा आणि मंत्र्याने जे वक्तव्य केले आहे ते देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे का? असा सवाल करतानाच मंत्र्यांची ही भूमिका भाजपला मान्य असेल तर बडतर्फ करणार नाही आणि मान्य नसेल, तर धाडसाने सरकार येत जात असतात, त्यामुळे कोणाकोणाला पदरात घ्यायचे व कोणाचे ओझे उचलायचे हे एकदा भाजपाने ठरवले पाहिजे”, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला